पळसगाव परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन अंतर्गत येत असलेल्या पळसगाव येथे रानडुकरांचा हैदोस सुरू आहे. परिणामी मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे घाणीचे साम्राज्य
राजुरा : तालुक्यातील काही गावात म्हशी व गाई मालकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खत साठविल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वच्छता अभियान राबवत असतानाच स्वच्छतेची ऐशीतैशी होत आहे.
नाल्याचा उपसा करण्याची मागणी
घुग्घुस : शहरातील काही वॉर्डातील नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाऊ शकत नाही. परिणामी ते साचून राहते, याकडे नगर परिषद प्रशासकांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी
चंद्रपूर : बाबूपेठमधील रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीस अडथळा होत आहे. या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात आली.
पडोली चौकातील अतिक्रमण हटवा
पडोली : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. सध्या कोरोनामुळे चौकात गर्दी कमी आहे. असे असले तरी अन्य वेळी हा चौक सतत गजबजलेला असतो. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
‘ते’ वीज खांब बदलविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे.