पोंभुर्णा : तालुक्यातील वाढती लोकसंख्या व परिसरातील जनतेची आरोग्यविषयक होणारी हेळसांड लक्षात घेता शासन स्तरावर पोंभूर्णा प्राथमिक रुग्णालयाचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात होणार असल्याचे निश्चित झाले असून तालुका परिसरातील जनतेच्या दृष्टीने सदर रुग्णालय देवाडाखुर्द-पोंभुर्णा या मुख्य मार्गावर असलेल्या शासकीय जागेवर करण्यात यावे जेणेकरून परिसरातील सर्वसामान्य जनतेला व शाळकरी मुलांपासून तर आबालवृद्धांना त्याचा फायदा होईल असे तालुक्यातील जनतेकडून बोलल्या जात आहे.गोंडपिपरी तालुक्याची पुनर्रचना होवून २६ जून १९९९ रोजी पोंभुर्णा तालुक्याची निर्मिती करण्यात आली. मात्र तालुका कार्यालयाचे आॅफीस मुख्य रस्त्यावर असलेल्या शासकीय जागेवर न बांधता ते पोंभुर्णा वस्तीपासून एक किमी अंतरावर असुविधेच्या ठिकाणी बांधकाम केल्याने परिसरातील वयोवृद्ध नागरिकांना त्या ठिकाणी पायदळी जावून आपली कामे करण्यास वाताहात करावी लागत असून त्याचा प्रचंड त्रास आबालवृद्धांपासून तर शाळकरी मुलांनासुद्धा सहन करावा लागत आहे. त्यावेळच्या तत्कालीन आमदार शोभाताई फडणवीस यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या अट्टाहासाला बळी पडून आपला सत्ता व अधिकाराचा वापर करून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन ही महत्त्वाची कार्यालये शासकीय जागा मुख्य मार्गावर असतानासुद्धा चुकीच्या जागेवर संबंधित कार्यालयाचे बांधकाम केल्याने आज त्या ठिकाणी कामे करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशीच अवस्था ग्रामीण रुग्णालयाचे बाबतीत होणार नाही यादृष्टीने रात्री-बेरात्री महिलांना जाण्या-येण्यासाठी त्रास होणार नाही हे दृष्टिकोन ठेवून पोंभूर्णा तालुक्याचे ग्रामीण रुग्णालय देवाडा खुर्द-पोंभुर्णा या मुख्य मार्गावर उपलब्ध असलेल्या शासकीय जागेवर बांधण्यात यावे. अशी मागणी पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष ओमेश्वर पद्मगिरीवार, नगर पंचायत सदस्य जयपाल गेडाम, सविता अशोक गेडाम यांनी वरिष्ठांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
देवाडा-पोंभुर्णा मुख्य मार्गावर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची मागणी
By admin | Updated: February 6, 2016 01:10 IST