भेजगाव : येथून जवळच असलेल्या दहेगाव, मानकापूर परिसरात अवैध कोंबडी बाजार भरविला जात असून, पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
कोंबड्यांच्या झुंज लावणे, त्यावर जुगार खेळणे यावर शासनाची बंदी आहे. मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोंबडी बाजार सुरू आहे. हा कोंबडी बाजार मूल तालुक्यातही सुरू असून, मूलच्या आजूबाजूला नियमितरीत्या दर बुधवार आणि रविवारला भरविला जातो.
यापूर्वी नागरिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या कोंबडी बाजारवर छापा टाकून कारवाई केली होती. यानंतर कोंबडी बाजार भरविणाऱ्यांनी आपले निश्चित एकच स्थळ न ठरविता एक दिवस आधीच संबंधितांना फोन करून स्थळ सांगितले जाते आणि तिथे कोंबडी बाजार भरविला जात असल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वी ताडाळा रोडवरील महाबीज जवळील परिसरांमध्ये कोंबडी बाजार भरविला गेला होता. ३ जानेवारी रोजी हा कोंबडी बाजार दहेगाव मानकापूर व येरगाव परिसरात भरविला गेला. या कोंबडी बाजारात बेकायदेशीर जुगार खेळला जात आहे. कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.