चंदनखेडा : संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथील अंकित श्रीकृष्ण मोहीतकर (१५) या युवकाचा डेंग्यूने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, याबाबत ‘आदर्श ग्राम चंदनखेड्यात डेंग्यूचा शिरकाव’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाने वेळीच याची दखल घेतली नाही. त्यामुळे नाहक युवकाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.घाणीने तुंबलेल्या नाल्या, गावालगतचे खतखड्डे, कुलर, टायर, डबके आदी मध्ये अनेक दिवसांपासून साचलेले पाणी, यामुळे गावात डासांचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचेच पर्यवसान गावामध्ये डेंग्यूसारख्या भयावह आजाराने शिरकाव केला. यात येथीलच पियुश किशोर ठावरी (१४) डेग्यू आजाराने ग्रस्त झाला. सदर बालकावर पालकांच्या सर्तकतेमुळे तात्काळ चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने तो बचावला. त्याच आठवड्यात पियुश ठावरी यांच्या घराजवळील अंकित श्रीकृष्ण मोहीतकर या युवकाला तापाने ग्रासले. त्यास २७ मे ला चंदनखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेले. परंतु प्रकृतीत सुधारणाचे चिन्ह न दिसल्याने आधी वरोरा नंतर चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. (वार्ताहर)
अस्वच्छतेने घेतला युवकाचा बळी
By admin | Updated: June 4, 2015 01:17 IST