चंद्रपुरात व्याख्यानमाला : गंगाधर बनबरे यांचे प्रतिपादनचंद्रपूर : महाराणी अहल्याबाई होळकर यांनी सतिप्रथेच्या विरोधात बंड पुकारले. त्यांनी पेशवाईच्या काळातील सती प्रथा, धर्मशास्त्रातील रुढी परंपरेसह मनुस्मृती झुगारुन महाराणी अहल्याबाई होळकरांनी स्वराज्य निर्माण केले असल्याचे प्रसिद्ध विचारवंत गंगाधर बनबरे यांनी व्याख्यानमालेत सांगितले. शिवमहोत्सव समितीद्वारा प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनीषा घाटे, प्रमुख व्याख्याते म्हणून गंगाधर बनबरे तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हासचिव महादेव ढुमणे, नगरसेविका ललिता गराड, प्रा. डॉ. ज्योती राखुंडे, नंदा शेळकी, डॉ. पल्लवी डोंगरे, सरपंच निर्मला मिलमिले, योगिता धांडे, अॅड. राजश्री मोहितकर, स्नेहलता आखरे, कमला वडस्कर, डॉ. एकता कुरेकर, शिला अडकिने, रत्नमाला बावणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.गंगाधर बनबरे पुढे म्हणाले, महाराणी अहल्याबाई यांच्या पतीचा वयाच्या २९ व्या वर्षी खंडेरावांचा मृत्यू झाला. त्यावेळी पेशवाईचे राज्य होते. पतीच्या निधनांतर ११ बायका सती जात गेल्या. मात्र अहल्याबाईचे सासरे मल्हारराव यांनी तिला सती जाण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अनेकांच्या बायका सती गेल्या. त्यावेळी मल्हारराव तिचे सासरे यांनी तिला खंबीरपणे बुरसट विचारसरणी व प्रथेच्या विरोधात संघर्ष करण्याचे प्रोत्साहन दिले, आत्मबळ दिले. त्यावेळेस पराक्रमी अहल्याबाईने लढाईचे सर्व कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे पराक्रमी अहल्याबाईंनी पेशवाईच्या मुजोरीचा सामना केला. यानंतर अनेक स्वाऱ्यावर चढाई करुन जिंकल्या आणि तिने स्वराज्य निर्माण केले. त्यामुळेच तिचे नाव इतिहासातील महानायिकांमध्ये घेतले जाते. आज काळ व परिस्थिती बदलली. परंतु आजही मनुस्मृती विचारसरणीचा बिमोड झाला नाही. त्यांच्या मानसिकतेबरोबर महिलांच्या मनातील गुलामगिरी संपण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बनबरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली भेदे यांनी केले तर आभार प्रतिभा भोयर यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)
वैदिक धर्मव्यवस्था झुगारुन महाराणी अहल्याबार्इंनी स्वराज्य निर्माण केले
By admin | Updated: December 19, 2015 00:54 IST