आवाळपूर : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणजे गडचांदूर. याची लोकसंख्या अंदाजे ४० हजाराच्या जवळपास असून याठिकाणी मोठी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बँकांसह इतर अनेक सोईसुविधा उपलब्ध असून आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिमेंट प्रकल्पसुद्धा आहे. या शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी दशकापासून सतत संघर्ष सुरू आहे. परंतु नेहमीच शासनातर्फे आश्वासनाचे लॉलीपॉप दिले जात आहे.
गडचांदूर तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष तुळशीराम भोजेकर, सचिव अशोक कुमार उमरे, मुख्य संघटक उद्धव पुरी, कोषाध्यक्ष डॉ. भोयर इत्यादींनी या भागातून तालुक्याची मागणी घेऊन २०११ मध्ये पहिला मोर्चा नागपूर विधानभवनावर काढला होता. तेव्हापासून सतत मोर्चे, आमरण उपोषण, हस्ताक्षर मोहीम, जनजागृती अशी अनेक प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. परिसरातील ५२ गावातील सर्वपक्षीय नेतेमंडळी व नागरिकांना सोबत घेऊन गेल्या दहा वर्षापासून सदर मागणी रेटून धरली असूनसुद्धा शासनस्तरावर यासंबंधी विचार करणार तरी कधी, असे सूर ऐकायला मिळत आहेत.
सरकार येणाऱ्या अधिवेशनात तरी गडचांदूर तालुका घोषित करून येथील नागरिकांच्या संघर्षाला पूर्णविराम देतील का, याकडे ५२ गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील मध्यभागी असलेल्या गडचांदूर शहरात अनेक मोठमोठे कारखाने असून तालुक्यातील मोठी बाजारपेठसुद्धा आहे. त्यामुळे जिवती, कोरपना, राजुरा या तिन्ही तालुक्यातील नागरिक गडचांदूर शहरात येतात. त्यामुळे जवळपास असलेल्या गडचांदूर शहर तालुका झाल्यास तिन्ही तालुक्यातील गावातील समावेश होणार.
हिवाळी अधिवेशनात मुद्दा गायब
नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले. मात्र दशकापासून मागणी असलेल्या गडचांदूर तालुका निर्मितीचा मुद्दाच चर्चेत आला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याउलट मात्र चर्चेत नसलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतला प्राधान्य देत तेथील निवडणुकीच्या तोंडावर नगर परिषद घोषित करून दिलासा दिला. मात्र गडचांदूरवासीयांच्या तोंडाला पाने पुसली.
कोट
गेल्या कित्येक वर्षांपासून आमचा तालुकानिर्मितीसाठी संघर्ष सुरू आहे. शासनाने याची दाखल घेऊन लवकरात लवकर तालुका घोषित करावा.
- उद्धव पुरी, मुख्य संघटक तालुका संघर्ष समिती गडचांदूर