चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या एका नराधमाने त्याच्या गर्भवती पत्नीवर चाकू हल्ला केला. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली, तर पोटातील आठ महिन्यांच्या गर्भाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पतीवर भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी गर्भाच्या मृत्युप्रकरणी नेमकी काय कारवाई करावी, या पेचात गोंडपिपरी पोलीस सापडले आहेत. यासाठी आता तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. गुरूवारी सकाळी गोंडपिपरी बायपासवर ही घटना घडली होती. गायत्री हरीश डाहे ही महिला बाळांतपणासाठी गोंडपिपरी येथे माहेरी आली होती. घटनेच्या अगोदरच्या रात्री तिचा पती हरीश सासरी गोंडपिपरीत आला. रात्रभर त्याने मुक्काम केला. गुरूवारी सकाळी शौचासाठी गेलेल्या गायत्रीवर हरिशने चाकू हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. चारित्र्याच्या संशयावरून आपण हा हल्ला केल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली आहे. या चाकु हल्ल्यात गायत्रीच्या पोटातील आठ महिन्याच्या गर्भालाही इजा झाल्याने त्याचा मृत्यू पोटातच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी हरिश डाहे याच्याविरुद्ध पत्नीवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी गर्भातील अर्भकाच्या मृत्युचे काय, त्याच्या मृत्युलाही हरीश डाहे कारणीभूत ठरला, अशावेळी कोणता गुन्हा दाखल करावा, अशा पेचात पोलीस सापडले आहेत. यापूर्वी अशा घटना घडल्या नसल्याने पोलीसही कायद्याविषयी अनभिज्ञ आहेत. यासाठी कोणता कायदा आहे, याची चाचपणी पोलिसांकडून केली जात आहे. तसेच कायदेतज्ज्ञांचाही सल्ला घेतला जात आहे. (प्रतिनिधी)
गर्भातील अर्भकाच्या मृत्यूने पोलिसांपुढे पेच
By admin | Updated: November 8, 2014 22:36 IST