चंद्रपूर : राज्यात बऱ्याच ठिकाणी मान्सून दाखल झाला असला तरी चंद्रपूर जिल्ह्याला आजही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याकडून मान्सून दाखल होण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे. मात्र तीव्र उन्हाचा कहर सुरूच असल्याने जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील १० धरणांपैकी सहा धरणात केवळ ५.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून चार धरण केव्हाचीच कोरडी पडली आहेत. पाऊस आणखी लांबणीवर गेल्यास जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गतवर्षी कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणे पूर्णपणे भरली नाही. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यातच धरणे कोरडी पडण्याची भीती होती. अशातच एप्रिल व मे महिन्यातील तीव्र उन्हामुळे नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड ही धरणे कोरडी पडली. तर आसोलामेंढा, घोडाझरी, अमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव व इरई धरणात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध होता. ही धरणेही कोरडी पडण्याच्या स्थितीत आली. सध्या राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकार पावसाच्या सरी पडलेल्या नाही. शेतकऱ्यांसह अनेकांचा जीव टांगणीला लागला असून उपलब्ध असलेला पाणीसाठा केव्हाही आटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
मान्सूनसाठी ‘तारीख पे तारीख’
By admin | Updated: June 23, 2016 00:31 IST