काँग्रेस पक्षाचे आयोजन : हजारो शेतकऱ्यांचा सहभाग, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदनचंद्रपूर: काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी धोरणा विरुद्ध शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन करुन विद्यमान राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यात हजारोंवर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.येथील गांधी चौकात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव देण्यात यावा, युपीए सरकारचा भूमी अधिग्रहण कायदा लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांना जोड धंद्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात यावे, कामगार विरोधी कायदा रद्द करुन जिल्ह्यातील बंद उद्योग सुरु करावे व भ्रष्टाचारी तथा घोटाळेबाज मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, काँग्रेसचे महासचिव अॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक प्रविण पडवेकर, बल्लारपूरच्या नगराध्यक्ष छाया मडावी, तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, अविनाश जाधव, जिल्हा परिषद गट नेते डॉ. सतिश वारजुरकर, विनोद अहीरकर, चंद्रकांत गोहोकर, ओमेश्वर पद्मगिरीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य गोदरु जुमनाके, प्रकाश गांगरेड्डीवार, तारासिंग कलशी, संजय महाडोळे, अनेकश्वर मेश्राम, अॅड. हरिश गेडाम, साईनाथ बुचे, चंद्रशेखर पोडे यांच्यासह शेकडा शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, धरणे आंदोलनातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात न्याय्य मागण्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनात जिल्हा भरातील शेकडोंवर शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)चंद्रपूर : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्ती व मुस्लिम समुदायाला आरक्षण, यासह इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.तत्पूर्वी येथील गांधी चौकात सभा घेण्यात आली. यावेळी आ. विजय वडेट्टीवार, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनिता लोढिया, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आश्विनी खोब्रागडे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजुकर, सुभाषसिंह गौर, डॉ. विजय देवतळे, आसावरी देवतळे, देवराव भांडेकर, प्रमोद राखुंडे, महेंद्र मेंढे, आबिद अली उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाभरातील हजारो शेतकरी गांधी चौकात एकत्र झाले. दुपारी १ वाजताच्या सुमारास गांधी चौकातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे ह्दयद्रावक दृष्य साकारण्यात आले होते. शहराच्या मुख्य मार्गावरून सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळालीच पाहिजे, मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे अशा घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, देवराव भांडेकर, शिवा राव, विनोद दत्तात्रय,आश्विनी खोब्रागडे, नंदा अल्लूरवार, डॉ. आसावरी देवतळे, यांच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे अशा नैसर्गिक संकटामुळे मागील वर्षी मोेठे नुकसान झाले. थोड्या फार प्रमाणात काही पिके आली. त्याला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे सध्या शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. बँकांचे कर्ज थकले आहे. पाल्यांचे शिक्षण, विवाह आदी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी त्याच्याकडे पैसा नाही. त्यामुळे आता अधिक उशिर न करता तातडीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली जावी व मुस्लिम समुदायाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांसाठी धरणे आणि मोर्चा
By admin | Updated: July 11, 2015 01:41 IST