मुख्यालय सक्तीचे करा
ब्रह्मपुरी : तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत अपडाऊन करत आहेत. त्यामुळे कार्यालयात वेळेवर पोहचू शकत नाही व ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे शासकीय कामांना वेळ होत आहे . कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्ती करा, अशी मागणी केली जात आहे.
बल्लारपूर - राजुरा अवैध वाहतूक
चंद्रपूर : दुर्गापूर किटाळी - भटाळी, पायली मार्गे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची कमी जात असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. खासगी वाहनाने वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू करण्याची आवश्यकता आहे.
रस्त्यावरील वाहनांमुळे प्रवाशांना त्रास
चंद्रपूर : येथील गंजवार्डा बाजारात जाणाऱ्या रस्त्यावर वाहने रस्त्यावर उभी केली जातात. या मार्गाच्या रस्त्यावर नाली बांधकाम सुरू आहे. त्यामुळे नागरिक बाजारात जाण्यासाठी आपली वाहने रस्त्याच्यावर उभी केली जातात. रस्त्यावरील वाहनामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता
कोरपना : येथील बसस्थानक परिसरात चंद्रपूर, वणी, आदिलाबाद आदी शहरातून मोठ्या प्रमाणात वाहनधारक येतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी गतिरोधक तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जडवाहतुकीला आळा घालण्याची मागणी
घुग्घुस : वणी मार्गावर जडवाहतूक मोठ्या संख्येने सुरु आहे. त्यामुळे अपघातही घडले आहे. याच मार्गावर वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. त्यामुळे कामगारांची सतत या रस्त्यावर वर्दळ असते. रस्त्याची दुरुस्ती करून जडवाहतुकीवर आळा घालण्याची मागणी होत आहे. नुकताच दोन दिवसांपूर्वी या मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू झाला होता.
बसस्थानक रस्त्याचे रुंदीकरण करावे
गडचांदूर : नांदा गावालगत उद्योग असल्याने दरवर्षी वाहनांच्या संख्येत भर पडत आहेत. बसस्थानक परिसरातील रस्ता अरुंद असल्याने वाहनांची मोठी गर्दी होते. सकाळी व सायंकाळच्या सुमारास नागरिकांची त्रेधातिरपीट उडते. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना धोका पत्करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी आहे
गडचांदूर - भोयेगाव मार्गावरील पिकांचे नुकसान
गडचांदूर : माजरी ते भोयेगाव रस्त्याचे अनेक दिवसापासून काम सुरू आहे. रस्त्यावर गिट्टी टाकून मुरुम टाकण्यात आला. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ तयार होऊन परिसरात पिके उभ्या पिकावर धुळीचा थर साचून राहतो. शेतीवर अनिष्ट परिणाम होत आहे.
हॉस्पिटल वॉर्डात कुत्र्यांचा हैदोस
चंद्रपूर : येथील हॉस्पिटल वॉर्डात मागील काही दिवसांपासून कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. ज्युबिली हायस्कूल समोरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसतिगृहाच्या पटांगणात या कुत्र्यांचा वावर असतो. हे कुत्रे लहान मुलांच्या व वाहनांच्या मागे धावतात. महापालिकेने येथील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
बेरोजगार युवक युवतींमध्ये निराशा
सावली : कला शाखेतील हजारो विद्यार्थी तृतीय श्रेणीने उत्तीर्ण होतात. या शाखेतील पुढचे शिक्षण घेऊनही नोकरीची हमी नाही. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. शासनाने विविध विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकर भरतीवर बंदी घातली तर दुसरीकडे ग्रामीण भागात महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. वाढती बेरोजगारीमुळे विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा बदलविल्याचे दिसून येते.
रस्त्यावर भरणाऱ्या बाजाराचा अडथळा
पडोली- येथील चंद्रपूर-वणी मार्गावर बुधवारी बाजार भरतो. या मार्गानी जाणाऱ्या नागरिकांना जाणेयेण्याकरीता त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय रस्त्यावर तुडुंब गर्दी असल्याने वाहनधारकांना त्रास होतो. बाजाराच्या दिवशी रस्त्यावर दुतर्फा दुकाने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
मत्स्य व्यवसायिकांना हवे अर्थसाहाय्य
वरोरा : मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व शिंगाड्याचे उत्पादन घेतात. व्यवसायाकरिता शासनाकडून निधी मिळत नाही. योजना कागदावरच आहेत. मत्स्यपालन बीजाई व शिंगाडा लागवडीकरिता मोठ्या निधीची आवश्यकता पडते. शिंगाड्याचा हंगाम संपला. परंतु, पुढील वर्षी अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.