रुग्णालयात वाहनतळाची समस्या
चंद्रपूर : कोरोनामुळे सध्या शहरातील रुग्णालय फुल्ल भरली आहे. मात्र बहुतांश रुग्णालयांना वाहनतळच नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रुग्णालयांना वाहनतळ निर्माण करण्यासंदर्भात सूचना द्याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुतळा परिसराची स्वच्छता करावी
चंद्रपूर : शहरात विविध चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांची देखभाल महापालिकेच्या वतीने केली जाते. मात्र काही पुतळ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पुतळा असलेल्या परिसरात अस्वच्छता आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जनावरांमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : येथील बिनबा गेट, पठाणपुरा रस्ता तसेच दाताळा मार्गावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे उभी राहत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, रात्री घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. याकडे लक्ष देऊन या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
--
झरपटच्या पुलाचे कठडे धोकादायक
चंद्रपूर : येथील झरपट नदीवरील पुलाचे कठडे धोकादायक झाले असून, अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात होण्यापूर्वी पुलाचे कठडे दुरुस्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या नदीवर परिसरातील अनेक लहान बालके पोहण्यासाठी येतात. त्यातच काही जण पुलावर उभे राहतात.
महागाई कमी करण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी सकाळी ११ वाजेपर्यंत किराणा दुकान सुुरू राहत असल्यामुळे या दुकानात गर्दी होत आहे. त्यातच महागाई वाढल्यामुळे गरिबांना जगणे कठीण झाले आहे. शासनाने महागाई कमी करून गरिबांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन सुरूच
चंद्रपूर : खातेनिहाय शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश आहे. मात्र बहुतांश कर्मचारी शहरात राहत असून तिथून आपला कारभार सांभाळत आहेत. सध्या कोरोनाची महामारी सुरू आहे. नागरिक भयभीत झाले आहेत. अशावेळी किमान शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी राहावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ट्रॅव्हल्स पुन्हा थांबल्या
चंद्रपूर : शहरातून नागपूर तसेत इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स धावतात. मात्र लाॅकडाऊन सुरू झाल्यामुळे पुन्हा ट्रॅव्हल्स बंद असून व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.
प्रसाधनगृह नसल्याने कुचंबणा
चंद्रपूर : शहरातील काही भागामध्ये सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन शौचालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे.