चंद्रपूर : राज्यात सध्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मागील एक ते दीड महिन्यात पाच दलितांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. यातील बहुतांश घटनेत पोलिसांनी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आणि खुनाच्या गुन्ह्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. यासर्व घटनांच्या निषेधार्थ बुधवारी रिपब्लिकन जनआंदोलन तथा पुरोगामी संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते व्ही. डी. मेश्राम यांनी केले. यावेळी दलित अत्याचाराच्या घटनांचा निषेध करुन गुन्हेगारांवर कठोर शिक्षा व्हावी तसेच गुन्हेगारांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.नितीन आगे, उमेश आगळे, माणिक उदागे, संजय खोब्रागडे यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करावी, दलितांवर अत्याचार करणार्यांची संपती जप्त करण्यात यावी, जिल्हास्तरावर फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित कायदा संसदेत पारित करुन देशभर लागू करण्यात यावा, दलितांवर अत्याचार करणार्यांविरुद्ध केलेल्या कारवाईचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध करावा, अनुसूचित जाती-जमाती कायद्यास सक्षम करावे, जिल्हा, तालुकास्तरावर दक्षता समिती स्थापन करुन त्यात आंबेडकरी कार्यकर्त्यांना सदस्य करण्यात यावे, म्हाडाप्रकरणी लाठीचार्ज करणार्या पोलिसांवर कारवाई करुन कार्यकर्त्यांवरील खटले मागे घ्यावे, दलितांवर बहिष्कार टाकणार्या, डॉ. आंबेडकर जयंतीवर हल्ले करणार्यांवर कारवाई करावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.निवेदन देणार्या शिष्टमंडळात व्ही. डी. मेश्राम, रमेशचंद्र दहिवडे, किशोर पोतनवार, खुशाल तेलंग, पी.व्ही. मेश्राम, हिराचंद बोरकुटे, राजेश पिंजरकर, बळीराज धोटे, बबनराव फंड, प्रा. माधव गुरनुले, संतोष रामटेके, अनु दहेगावकर, इ. तु. बुरचुंडे, चरणदास नगराळे, अँड. एम. पी. तेलंग, अँड. सत्यविजय उराडे, भारत थुलकर, प्रा. नामदेव कन्नाके, प्रा. सुब्रतो दत्ता, अशोक निमगडे, गोपी मित्रा, तेजराज भगत, सुरेश नारनवरे, सुरेश खरतडे आदींसह रिपब्लिकन जनआंदोलन तथा पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
रिपब्लिकन जनआंदोलन व पुरोगामी संघटनेचे धरणे
By admin | Updated: May 29, 2014 23:57 IST