वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : मनपा प्रशासनाने आझाद बागेजवळ पे पार्किंग सुरू केली असली तरी रघुवंशी कॉम्प्लेक्स ते हिंदी सिटी हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर अवैधरीत्या चारचाकी वाहने पार्क केली जात आहेत. ही वाहने दिवसभर तिथेच राहत असल्याने या रस्त्यावर अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे येथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.
पुरस्कारप्राप्त गावातच स्वच्छतेचे तीनतेरा
सिंदेवाही : ग्रामीण भागातील हागणदारी बंद व्हावी, यासाठी शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. गावात शौचालयाची संख्या वाढली. परंतु, या शौचालयाचा वापर नगण्य आहे. त्यामुळे प्रशासनो जनजागृती करावी, तसेच उघड्यावर जाणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वटवाघूळांचे अस्तित्व आले धोक्यात
चंद्रपूर : अलीकडे वटवाघूळांची संख्या कमी होत आहे. त्यांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल. तसे होऊ नये म्हणून मानवी संघटना व शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पक्षी मित्र संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सर्वांनी मिळून वटवाघूळांचे अस्तित्व टिकविणे गरजेचे आहे.
जनावरांच्या विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल
चंद्रपूर: पूर्वी गावोगावी आढळणारे जनावरांचे कळप आता इतिहासजमा होत आहेत. सततच्या ओल्या आणि कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचे पालनपोषण करणे आता कठीण होत असल्यामुळे तसेच जनावरांच्या चारापाण्याची समस्या निर्माण होत असल्याने शेतकरी, शेतमजुरांनी जनावरे मिळेल त्या भावात विक्रीला काढली आहेत.
शासकीय योजनांचा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ द्या
चंद्रपूर : शासनाने गोरगरिबांना विविध धान्य व योजनेचा लाभ मिळावा म्हणून बीपीएल यादी तयार केली. मात्र या यादीत गोरगरिबांऐवजी श्रीमंत, सधन कुटुबांचीच नावे समाविष्ट असल्याचा आरोप केला जात आहे. यात गरिबांची पिळवणूकच होत असून खऱ्या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
पथदिवे बंद, सुरू करण्याची मागणी
सावली : तालुक्यातील अनेक गावांचे पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. रात्री साप, विंचूसारखे सरपटणारे प्राणी रस्त्यावर येतात. अंधार असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. चोरांचाही त्रास वाढला आहे. पथदिवे सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बेरोजगारांसाठी शिबिर राबवावे
चंद्रपूर : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे आजची युवा पिढी ही नैराश्यात जगत आहे. अनेकांनी पैसे खर्च करून स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू केले. मात्र कोरोना संकट तसचे शासनाकडून नोकर भरती बंदीमुळे दिवसेंदिवस बेरोजगारीच्या संख्येत वाढ होत आहे. शासन बेरोजगारासाठी मोठमोठ्या योजना राबविते. परंतु ढिसाळ नियोजनामुळे त्याचा फायदाही बेरोजगारांना होत नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांसाठी योग्य मार्गदर्शन शिबिर राबविण्याची मागणी होत आहे.