बगळ्यांचे मृत्यूप्रकरण : नवी दहेली येथील घटनाचंद्रपूर : केवळ विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास होतो म्हणून पाखरांची घरटी उद्ध्वस्त करणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली येथील धीरज निरंजने व योगेश पोतराजे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ व वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.नवी दहेली गावात मोठ्या प्रमाणावर चिंचेची झाडे असून या झाडांवर बगळ्यांचा अधिवास आहे. सध्या विणीचा काळ आहे. या बगळ्यांच्या विष्ठेमुळे गावकऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे कारण पुढे करून या झाडांची कत्तल करण्याचा अघोरी ठराव ग्रामपंचायतीने घेतला. गंभीर बाब ही की वन विभागाच्या परवानगीने चिंचेची झाडे तोडता येत नाही. असे असतानाही ग्रामपंचायतीने वन विभागाची परवानगी न घेता बगळ्यांचा अधिवास असलेली चिंचेची नऊ झाडे तोडून टाकली. काही झाडांच्या फांद्याही तोडल्या. यामुळे या झाडांवर अधिवास करून असलेले शेकडो बगळे विस्थापित झालेत. त्यात १२५ बगळ्यांचा मृत्युही झाला. दरम्यान, नवी दहेली येथील पक्षीप्रेमी विजय मेश्राम यांनी याबाबत तातडीने ईको-प्रोकडे तक्रार केली. तक्रारीनंतर ईको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वन विभागाला घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. माहिती मिळताच, शनिवारी वन विभागाचे शिघ्र कृती दल व ईको-प्रोचे स्वयंसेवक नवी दहेली गावात जाऊन धडकले आणि त्यांनी झाडांची कत्तल थांबविली. यामुळे १२५ बगळे मृत्युमुखी पडले तर ३१८ जीवंत पिल्लांना वन कर्मचारी व ईको-प्रोच्या सदस्यांनी कारवा नर्सरीत उपचारासाठी आणले.येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बहार बाविस्कर नागपूर, डॉ.रवी खोब्रागडे हे उपचार करीत आहे. त्यांच्याच देखरेखीखाली पिल्लांना ठेवण्यात आले आहे. याकामी ईको-प्रोचे सहकार्य मिळत आहे. (प्रतिनिधी)
चिंचेची झाडे तोडणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल
By admin | Updated: August 3, 2015 00:39 IST