मूल : तालुक्यातील ग्रेटा पॉवर लिमिटेड कंपनीत उपाहारगृह चालविणाऱ्या मनीष रक्षमवार यांच्याविरुद्ध कंपनीच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर तडजोडीसाठी पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या विदर्भ प्रवाह कामगार संघटनेचा अध्यक्ष लोकेशकुमार बिसेन याच्या विरोधात मूल पोलिसांनी भादंवि ३८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.मूल येथील रहिवासी मनीष प्रकाश सक्षमवार यांचे आकापूर येथील गे्रटा पावर लिमिटेड कंपनीत उपहारगृह आहे. गेल्या एक वर्षांपासून उपाहारगृह सुरळीत सुरू असताना विदर्भ प्रवाह कामगार संघटनेचा अध्यक्ष लोकेश कुमार बिसेन याने रक्षमवार यांना पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर लोकेशकुमार बिसेन यांनी कंपनीच्या व्यवस्थापकाकडे उपाहारगृहाबाबत तक्रार केली. त्यानंतर रक्षमवार यांनी बिसेन यांना विचारणा केली असता तक्रारीची तडजोड केली जाईल. मात्र पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर वारंवार फोन करुन बिसेन पैशाची मागणी करु लागला. दरम्यान, रक्षमवार यांनी दूरध्वनीवरील संपूर्ण संवाद रेकॉर्ड केले. त्या रेकॉर्डसह ेमूल पोलीस ठाण्यात लोकेशकुमार बिसेन याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. मूल पोलिसांनी बिसेनविरुद्ध भादंवि ३८५ गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक जी.आर. विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आर.डी. कुनघाडकर करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रवाह कामगार संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: April 19, 2015 01:07 IST