नागरिक, वकील उपस्थित : विविध कायद्याची दिली माहिती गडचिरोली : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व ग्रामपंचायत वाकडी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ग्रामपंचायत वाकडी येथे फिरते लोक न्यायालय व विधी जनजागृती यावर कायदे विषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्ती न्यायाधीश आर. बी. म्हशाखेत्री होते. यावेळी अॅड. ए. पी. चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली बांबोळे, वाकडीचे सरपंच चरणदास बोरकुटे, पं.स. सदस्य जान्हवी भोयर, पोलीस पाटील देवेंद्र वाकडे आदी उपस्थित होते. यावेळी अॅड. ए. पी. चौधरी यांनी फिरत्या लोक न्यायालयाचे महत्त्व समजावून सांगितले. सरपंच चरणदास बोरकुटे यांनी तंटामुक्त गावातील समस्या सामंजस्याने सोडविण्याबाबत मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त न्यायाधीश आर. बी. म्हशाखेत्री यांनी फिरत्या लोक न्यायालयाची माहिती उपस्थितांना देऊन हिंदू विवाह कायदा, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ आदी बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विधी सेवा प्राधिकरणाचे लिपीक नरेंद्र लोंढे यांनी तर आभार एच. डी. गेडाम यांनी मानले. या कार्यक्रमाला वाकडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
फिरते न्यायालय वाकडीत पोहोचले
By admin | Updated: April 16, 2017 00:28 IST