गडचांदूर : किरकोळ न्यायालयीन प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व लोकांना नेहमी राजुऱ्यापर्यंत जाण्याची गरज भासू नये, म्हणून गडचांदुरात ग्राम न्यायलयाची निर्मिती करण्यात आली. मात्र जागेअभावी सदर न्यायालय गोदामाध्ये भरत आहे. त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून ग्राम न्यायालयालाच न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरपना व जिवती तालुक्याचे केंद्रबिंदू असलेल्या गडचांदुरात सहा-सात वर्षापूर्वी ग्राम न्यायालय सुरु करण्यात आले. बाजाराच्या दिवशी दर मंगळवारला हे ग्राम न्यायालय सुरु असते. पूर्वी नगरपरिषदेच्या बिर्ला सभागृहात हे ग्राम न्यायालय भरायचे. मोठ्या थाटात या ग्राम न्यायालयाचे उद्घाटनही झाले होते. मात्र नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर नगरपरिषदेचे सामूहीक कार्यालय सदर सभागृहात सुरु करण्यात आल्याने ग्राम न्यायालयाकरिता जागा उपलब्ध राहिली नाही. त्यामुळे आता गेल्या सात-आठ महिन्यांपासून ग्राम न्यायालय नगर परिषदेच्या गोदामात सुरू आहे.येथे न्यायाधिशांना, वकिलांना व पक्षकारांना बसण्याची व्यवस्था नाही. शौचालय व पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नसल्याने ग्राम न्यायालय किती दिवस टिकणार हा प्रश्न पडला आहे. न्यायालयात खुर्चीचा पत्ता नसल्याने कधी - कधी न्यायधिशासह वकील, पक्षकार, गैरअर्जदार व अर्जदार या साऱ्यांनाच बसायला मिळत नाही. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गडचांदुरात ग्राम न्यायालय सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर लोकांच्या वादाचा निपटारा होऊ शकला नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन ग्राम न्यायालयाला जागा मिळवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
न्यायालयालाच हवा न्याय
By admin | Updated: March 12, 2015 00:42 IST