हंसराज अहीर : सिमेंट क्राँक्रिट रस्त्याचे भूमिपूजनचंद्रपूर : चंद्रपूर महानगराच्या विकासाला गती मिळावी, आवश्यक असलेल्या सोयीसुविधा व नागरी सेवा उपलब्ध व्हाव्यात, महानगराचा चहुमुखी विकास साधला जावा, अशी भावना लोकांची आहे. या भावनांचा आदर राखत महानगराच्या विकासाचे लक्ष्य बाळगण्याचे कर्तव्य पार पाडणे ही लोकप्रतिनिधी तसेच महानगराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महापौर तसेच सर्व नगरसेवकांची जबाबदारी आहे. या जबाबदारीचे योग्य प्रकारे कार्य केल्यास महानगराचा जलदगतीने विकास होईल असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. प्रत्येक प्रभागात विकासाची कामे करून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न महानगर पालिकेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे हे चंद्रपूर महानगर भविष्यात स्वच्छ, सुंदर बनेल व विकास संपन्न होईल, असा आशावाद खा. हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. शंकर गृहनिर्माण सहकारी संस्था, आकाशवाणी रोड चंद्रपूरद्वारा सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन तथा रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, चंद्रपूर महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष विजय राऊत, भाजपा मनपा गटनेते अनिल फुलझेले, झोन सभापती अंजली घोटेकर, नगरसेवक देवानंद वाढई, राहुल पावडे, नगरसेविका सुनीता लोढीया, नंदकिशोर बुटले, प्राचार्य बबनराव राजुरकर व शंकर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ५१ जणांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जोपासत नागरिकांनी प्रत्येक कार्यात सहभागी व्हावे तसेच विकासाला चालना द्यावी, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना केले. (स्थानिक प्रतिनिधी)
नगरसेवकांनी महानगराच्या विकासाचे लक्ष्य बाळगावे
By admin | Updated: December 4, 2015 01:26 IST