विकास कामांना प्रारंभच नाही : चिमूर व इतर गावात अनेक समस्या चिमूर : चिमूर क्रांतीभूमीतील पहिल्या नगर परिषदेमधील लोकप्रतिनिधी म्हणजे नगराध्यक्ष. त्यांच्यासह नगरसेवकांच्या माध्यमातून कारभार सुरू झालेला असून या नगर परिषदेमध्ये चिमूरसह बाम्हणी, काग, सोनेगाव, शेडेगाव, वडाळा(पैकू), पिंपळनेरी या गावांचा समावेश आहे. चिमूर नगर परिषद क्षेत्रात विकास कामे सध्या थंडबस्त्यात असून अजूनपर्यंत विकास कामे सुरू झाले नाही. आतातरी नगरसेवकांनी हेवदाने विसरुन विकास कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.चिमूरमध्ये आठवडी बाजाराचा गंभीर प्रश्न, मटन मार्केट, पिाण्याच्या पाण्याची समस्या आहे. नगर परिषद क्षेत्रातील इतर गावात स्वच्छतेचा अभाव दिसत आहे. प्रलंबित आठवडी बाजाराचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही. राज्य महामार्गावर आठवडी बाजार होत असल्याने वाहतूक करीत असताना अडचण निर्माण होत आहे. दोन-दोन तास वाहनांना एकाच ठिकाणी उभे राहावे लागते. अपघाताची शक्ययता नाकारता येत नाही. आठवडी बाजार हा तलावातील नियोजीत जागी काही वेळा भरला. परंतु व्यवस्था नसल्याने पावसाळ्यातून पुन्हा राज्य मार्गावर बाजार आला. बाजाराची कायमस्वरुपी जागा तलावाच्या जागेवर नियोजित करण्यात यावी. शहरात विविध ठिकाणी मटन, चिकनची दुकाने आहेत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मटन चिकनचे एकाच ठिकाणी मार्केट करण्यात यावे. शहरातील अनेक वॉर्डातील नाल्यांचा अजूनपर्यंत उपसा केले नाही. त्याकडे लक्ष द्यावे. काही ठिकाणी नाली बांधकाम झाले नाही. त्याठिकाणीसुद्धा बांधकाम करण्यात यावे. निधीची कमतरता असल्यामुळे विकास कामे करण्यास असमर्थ ठरले आहे. शासनाने नगर परिषद मंजूर केली तर निधी उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. आजच्या तारखेत निवडणूका झाल्यावर नगरसेवकांना खातेवाटप करुन सभापती नियुक्त झाले. मात्र सभापतींना स्वतंत्र कक्ष प्राप्त झाला नाही. तेही प्रतीक्षेत आहे. घरकूलाच्या प्रश्नांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
नगरसेवकांनी चिमूरच्या विकास कामाकडे लक्ष देणे गरजेचे
By admin | Updated: February 14, 2016 01:01 IST