महापौरांनी घेतला सिटी टास्क फोर्सचा आढावा
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या नवीन बेघर निवारा येथे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी सर्वसोयीसुविधांची पूर्तता झाली आहे. त्यासाठी ४५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. ६ डॉक्टर, ६ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या शनिवारपर्यंत उर्वरित वैद्यकीय सुविधांची पूर्तता होताच येत्या आठवड्याअखेर मनपाचे कोविड हॉस्पिटल सुरू होण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सिटी टास्क फोर्सची बैठक पार पडली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, सत्तापक्षनेता संदीप आवारी, गटनेते पप्पू देशमुख, सहआयुक्त धनंजय सरनाईक, सहआयुक्त शीतल वाकडे, सहआयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखा अधिकारी संतोष कंदेवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, आदींसह वैद्यकीय चमू उपस्थित होते.
शहरात एकूण २६ केंद्र प्रस्तावित असून, सध्या १७ केंद्रांसाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. केंद्र वाढविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांसाठी काही केंद्र राखीव ठेवणे, आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.
आठवडाभरात ४५ खाटांचे कोविड रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज केले आहे. त्यासाठी ४५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात वातानुकूलित सुविधा राहील. ६ डॉक्टर, ६ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच एमबीबीएस आणि फिजिशियन डॉक्टरची नियुक्ती करण्यात येईल. येत्या काही दिवसांत औषध साठा आणि वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा होईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी बैठकीत दिली.
बाॅक्स
गृहविलगीकरणातील रुग्ण संख्या ४० टक्क्यांवर आणणार
गृहविलगीकरणातील रुग्ण संख्या कमी करून त्यांना शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सध्या महानगरपालिका हद्दीत ८० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. अनेकांच्या घरी रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. झोपडपट्टी परिसरात बिकट स्थिती आहे. अशावेळी संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे गृहविलगीकरणातील रुग्ण संख्या ४० टक्क्यांवर आणण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या.
कोट
एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक गाठला होता. राज्य शासनाने निर्बंध घातल्यानंतर नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा काहीसा घटला आहे. शहरातील बंगाली कॅम्प, गंज वॉर्ड अशा ठिकाणी गर्दी होणार नाही, त्यासाठी झोनच्या सहआयुक्तांनी पुढील १५ दिवस अतिदक्षता घ्यावी.
- राजेश मोहिते
आयुक्त,मनपा