चंद्रपूर : ऑक्सिजन सिलिंडर व त्यासाठी लागणारी इतर सामग्री याचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे कोविड रुग्णालय उभारण्यावर मर्यादा येत आहेत. यावर उपाय म्हणून हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरची मोठ्या प्रमाणात खरेदी करून रुग्णांचे प्राण वाचवावेत, तसेच प्रवेशद्वार व सौंदर्यीकरणाची कमी गरजेची कामे तात्पुरती रद्द करून सर्व निधी कोरोना रुग्णांना उपचाराच्या सुविधा देण्यासाठी वापरावा, अशी मागणी जनविकास सेनेचे वडगाव प्रभागातील नगरसेवक पप्पू देशमुख यांनी विशेष सभेमध्ये केली.
गजानन महाराज व साईबाबा मंदिरच्या रोडवर लाखो रुपये खर्च करून प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. गजानन महाराज आणि साईबाबा यांनी दाखविलेला सेवेचा मार्ग पत्करून वडगाव प्रभाग किंवा शहरातील इतर ठिकाणचे सौंदर्यीकरण व प्रवेशद्वाराची कामे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील कोरोना रुग्णांसाठी ४५ बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारण्याच्या हेतूने मनपाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ही मागणी केली.
सभागृह नेते संदीप आवारी, शिवसेनेचे गटनेते सुरेश पचारे यांच्यासह पप्पू देशमुख व इतर नगरसेवकांनी आपले पुढील काळातील संपूर्ण मानधन कोविड रुग्णांवर उपचारासाठी देण्याची तयारी विशेष सभेमध्ये दर्शवली.