केंद्र शासनाच्या आदेशानुसार, पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून हेल्थ केअर वर्कर व फ्रन्ट लाइन वर्करला लस देण्याची देशव्यापी मोहीम सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यात ६० पेक्षा जास्त वय तसेच ६० ते ४५ वयोगटांतील गंभीर आजारी असणाऱ्यांना लस दिली जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही लस टोचून घेण्यासाठी नागरिक आता पुढे येत आहेत. नोंदणी केलेले आरोग्य कर्मचारी व फ्रन्ट लाइन वर्करर्सने पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले. त्यामुळे शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या शेवटचा बुस्टर डोसही घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर व राज्य आरोग्य विभागाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार, पहिल्या डोसनंतर बुस्टर डोसचे २८ दिवसांचे नियोजन आहे. परिणामी, हा डोस कदापि चुकू नये, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा व चंद्रपूर मनपा आरोग्य विभागाकडून लस घेणाऱ्या नागरिकांचे सातत्याने समुपदेशन केले जात आहे.
बुस्टर डोस म्हणजे काय?
कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतल्यानंतर साधारणत: पुढील १५ दिवसात कोरोनाशी लढण्याचे अॅन्टिबॉडी म्हणजे प्रतिपिंड शरीरात तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. विषाणुशी लढण्याची प्रतिकारशक्ती तयार होऊ लागते. दरम्यानच्या काळात प्रतिकारशक्ती वाढली नसताना उपायांचे पालन न करता पॉझिटिव्हशी संपर्क आल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, आजाराची तीव्रता वाढत नाही. त्यामुळे २८ दिवसांनंतरचा बुस्टर डोस न चुकता घेतला पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
लसीकरणात तीन तालुके माघारले
लसीकरण करण्यात जीवती (१५४९), पोंभुर्णा (२५७६) व गोंडपिपरी (२५२०) तालुके माघारले आहेत. अन्य तालुक्यांचे लसीकरण अजूनही तीन हजारांच्या पुढे गेले. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी नवीन केंद्रांची निर्मिती करावी लागणार आहे.
ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांचा प्रतिसाद
शनिवारपर्यंत ६०पेक्षा जास्त वय आणि ६० ते ४५ वयोगटांतील व्याधीग्रस्त ३६ हजार १८२ जणांनी प्रतिबंधात्मक लस घेतली. शनिवारी एकाच दिवशी १६ हजार ९३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचली. ऑफलाइन नोंदणी सुलभ असल्याने ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चंद्रपुरातील टागोर प्राथमिक शाळेच्या केंद्रात दिसून आले.