चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. आता यात आणखी बदल करण्यात येणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केलेले वार्षिक, मासिक आणि तासिकांचे नियोजन जिल्हा स्तरीय समिती करून देणार आहे. सदर नियोजन पुढील सत्रात सुरु होणार आहे. या नियोजनामुळे एकसुत्रता येणार आहे. यामुळे शिक्षकांचा त्रास कमी होणार असून अधिकाऱ्यांना शाळा तपासणीदरम्यान सोयीचे होणार आहे.महाराष्ट्र राज्य प्र्राथमिक शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल घेत शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी समस्या निवाराण सभा घेतली.यावेळी विस्तार अधिकारी अनमुलवार, नागतोडे, अधिक्षक लाकडे, कक्षअधिकारी शरद रामटेके यांच्यासह संघटनेच्या वतीने जिल्हा नेते जी.जी. धोटे, जिल्हाध्यक्ष राजकुमार वेल्हेकर, सरचिटणीस जे.डी.पोटे, कोषाध्यक्ष पंढरी डाखरे, गोंडपिपरीचे बाळकृ्ष्ण मसराम, मूलचे जगदीश दुधे आदी उपस्थित होते.महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. सध्या वाघ, बिबट आदी वन्यप्राण्यांची जंगलव्याप्त भागात दहशत आहे. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी शालेय सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभरात घेण्याची विनंती करण्यात आली. सदर मागणी रास्त असून यासाठी आपण जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवू असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. काही शिक्षक शाळेच्या वेळेत सुटी न टाकता जिल्हा परिषदेमध्ये येतात. अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शिक्षकांच्या या कृतीवर आळा घालण्यासाठी कारवाईचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले. सदर आदेश अभिनंदनीय असल्याचे संघटनेने म्हटले. शिक्षकांच्या कामात सुधारणा होण्यासाठी गोपनीय अहवालाची सत्यप्रत शिक्षकांना देण्यात येत नसल्याची तक्रार करण्यात आली. याससंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समितीना पत्र पाठवून गोपनिय अहवालाची एक प्रत शिक्षकांना देण्याचे कबुल केले. पगाराच्या दिवशी पूर्वी प्रमाणे सकाळपाळीत शाळा घेण्याची, निवड श्रेणीसाठी संबंधित शिक्षकांना प्रशिक्षासाठी पाठवावे, आदी विषयांवरही चर्चा करण्यात आली. वरोरा पंचायत समितीमधील शिक्षकांच्या घरभाड्याची थकीत १ कोटी ४० लाख रुपये दिल्याचे सांगून उर्वरित १ कोटी ६० लाख रुपये डिसेंबरमध्ये देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी शिक्षणाधिकारी देशपांडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. (नगर प्रतिनिधी)
अभ्यासक्रमातील नियोजनात येणार एकसूत्रता
By admin | Updated: November 30, 2014 23:02 IST