ब्रम्हपुरी : केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके आणली असून हे शेतकरीविरोधी जाचक काळे कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी दीड महिन्यापासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून शेकडो गाड्यांनी ३ जानेवारी रोजी नागपूर येथील संविधान चौकात विशाल सभा घेऊन सावनेर मार्गे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व सिंदेवाही तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झालेत. केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी कृषीची तीन विधेयके आणली. या विधेयकाला हरियाणा, पंजाबसह इतर राज्यांच्या शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. कृषी विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून भर थंडीत दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाची अद्यापही केंद्र सरकारने दखल घेतली नाही. म्हणून आंदोलनकर्त्याना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातून किसान सभेचा शंभर वाहनांचा ताफा दिल्लीकडे रवाना झाला. यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे, किसान सभेचे कार्यकर्ते श्रीधर वाढई, आयटक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष वनिता कुंटावार, नानाजी दांडेकर, तुळशीराम मेश्राम, उषा बोरकर, रेश्मा कोटरांगे, नानाजी मेश्राम यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
दिल्लीच्या किसान मोर्चासाठी शंभर वाहनांचा ताफा रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST