कार्यकर्ता प्रशिक्षण : हंसराज अहीर यांनी दिल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचनाचंद्रपूर : देशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मागील नाकर्त्या शासनामुळे या सरकारवर जनतेच्या अपेक्षांचे मोठे ओझे आहे. सरकार जनसामान्यांच्या विकासासाठी सर्व पातळीवर अपेक्षित परिवर्तन घडवण्यासाठी कार्य करीत असून सरकारने विविध क्षेत्रात केलेल्या कामाची आणि लोकहित निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारून लोककल्याण योजना राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. पंडित दीनदयाल उपाध्याय भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत स्थानिक दाताळा रोडवरील लॉन येथे आयोजित प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना शामकुळे, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, हरिश शर्मा, देवराव भोंगळे, रामपाल सिंह, प्रमोद कडू, ब्रिजभूषण पाझारे, वनिता कानडे, अंजली घोटेकर, नामदेव डाहुले, बंडू पदलमवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना ना. अहीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णय व योजनांची माहिती देताना मेक इन इंडिया, स्कील इंडिया आणि डिजीटल इंडियामुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचे सांगत युवकांनी आता उद्योगाकडे वळून देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान द्यावे. तसेच पारंपारिक रोजगाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार करता येणे शक्य असल्याचे उदाहरण देऊन स्पष्ट करताना त्यांनी कार्यकर्त्यांना ग्रामीण भागात पारंपारिक रोजगाराकडे लोकांना आकृष्ट करण्यासाठी कार्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे सांगितले.भाजप पक्ष संघटना आणि सरकार यांच्यातील समन्वयाबद्दल सांगताना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशिक्षित कार्यकर्ता ही काळाची गरज असून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जबाबदार कार्यकर्ता घडेल, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांच्या अविश्रांत परिश्रमातूनच पक्ष संघटन अधिक मजबूत होवून तो सत्तेच्या जवळ पोहचतो. आज सत्तेच्या माध्यमातून आपण हे सत्य अनुभवतो आहोत. राज्य सरकारने राज्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. परंतु या योजना तळागाळातील लोकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी उचलल्याखेरीज हे साध्य होणार नाही. कार्यकर्त्यांनी हे कार्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी आ. नाना शामकुळे यांनी पक्षाच्या संघटनेत कार्यकर्त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व विषद करून आज आपण सत्तेवर असल्याने कार्यकर्त्यांची जबाबदारी शतपटीने वाढली आहे. पक्षाचे कार्यकर्ते हे समाजाभिमुख असल्याने त्याचा लाभ पक्षीय संघटना मजबुतीने उभी होण्यात झालेला आहे. भारतीय राज्यघटनेने समान न्याय ही संकल्पना मांडली आहे. त्यामुळे शासनाच्या विविधांगी योजनांचा लाभ त्या-त्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी या योजनांची सर्वकष माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत या योजना पोहचतात किंवा नाही, याची दक्षताही एक जबाबदार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भ विभागीय कार्यालय प्रमुख संजय फांजे यांनी मिडिया व्यवस्थापन व सोशल मिडियामध्ये कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर सखोल विवेचन केले. प्रमोद कडू यांनी जनसंघ ते भाजपा या वाटचालीचा परामर्श घेतला. या कार्यक्रमाला भाजपा चंद्रपूर महानगरचे जिल्हाध्यक्ष विजय राऊत, भाजपा नेते प्रमोद कडू, देवराव भोंगळे उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा महामंत्री हरिश शर्मा यांनी केले. संचालन अंजली घोटेकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा
By admin | Updated: January 19, 2016 00:42 IST