चंद्रपूर : कोरोनाच्या या बिकट स्थितीत रुग्णांची धावपळ सुरू झाली आहे. कुणाला ऑक्सिजन तर कुणाला व्हेंटिलेटरची गरज आहे. अशा स्थितीत जिल्हा व मनपा प्रशासनाने गेल्या वर्षी सुरू होऊन लवकरच बंद पडलेल्या गंगाकाशी कोविड रुग्णालयाची पडून असलेली यंत्र सामग्री उपयोगात आणली, तर कोरोना रुग्णांची हेळसांड काही प्रमाणात थांबविता येणे शक्य असल्याची बाब पुढे येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. वाढती रुग्णसंख्या बघता परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी स्थिती आहे. चंद्रपुरात गेल्या वर्षी येथील शकुंतला लॉनवर गंगाकाशी कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले होते. मात्र, कालांतराने कोरोनाचा ग्राफ कमी होत गेला. रुग्णसंख्याही झपाट्याने कमी होत गेली. यामुळे या रुग्णालयाची गरजच भासली नाही. हे रुग्णालय सर्व सुविधांनी युक्त असे होते. खाटांच्या सुविधेसह ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह कोरोना रुग्णालयासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री नव्याने खरेदी करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही यंत्रसामुग्रीही रुग्णाच्या उपयोगात आली नाही, नंतर रुग्णालय बंद करण्यात आले. मात्र, या रुग्णालयाची यंत्रसामग्री अद्यापही तशीच असल्याचे समजते. सध्या कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता, चंद्रपूर जिल्हा व मनपा प्रशासनापुढे ही बिकट स्थिती हाताळण्याचे मोठे आव्हान आहे. रुग्णालयाची उभारणी करण्यासाठी सर्व सोयीची पूर्तता करावी लागते. सर्व साधनसामग्री खरेदी करावी लागते. येथील महिला रुग्णालय याच कारणाने उद्घाटन होऊनही सुरू झाले नाही. गंगाकाशी कोविड रुग्णालयाची सध्या कोणत्याही कामात येत नसलेली यंत्र आणि साधनसामग्री जिल्हा व मनपा प्रशासनाने उपयोगात आणली, तर रुग्णांसाठी अपुऱ्या पडत असलेल्या सोईसुविधा उपलब्ध होईल. कोरोना रुग्णांची होत असलेली हेळसांडही थांबविता येईल, यासाठी केवळ सकारात्मक पावले उचलण्याची तेवढी गरज आहे.