चंद्रपूर : शहर महानगरपालिका व इको प्रो-संस्थेतर्फे ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहीर स्वच्छता अभियान संयुक्तरित्या हाती घेण्यात आली आहे. बाबूपेठ येथील अभियानस्थळी शनिवारी आयुक्त राजेश मोहिते यांनी भेट दिली व ऐतिहासिक विहीर स्वच्छतेची पाहणी केली.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत मनपा व इको प्रो-संस्थेने दुर्लक्षित असलेल्या शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहीर स्वच्छ करण्याचे संयुक्त अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत बाबूपेठ परिसरातील जवळपास ६० फूट खोल असलेली व सुमारे तीन मजली पायऱ्यांची गोंडकालीन विहीर स्वच्छ करण्यापासून सुरुवात करण्यात आली.
विहीर दुर्लक्षित असल्यामुळे यात कचरा फेकला जात होता. विहिरीच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात झाडे उगली होती. ही झाडे सर्वप्रथम कापण्यात आली. उगविलेल्या झाडांमुळे भिंती कमकुवत होऊन प्राचीन वास्तुला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. यावर जाळी लाऊन कचरा फेकला जाऊ नये, याची काळजी घेण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानामुळे प्राचीन विहिरींना सुरक्षितता व त्यांचे संवर्धन करणे शक्य होणार आहे.
आयुक्त राजेश मोहिते म्हणाले, विहीर केवळ गोंडकालीन जलस्तोतच नाही, तर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. नैसर्गिकरित्या मिळणारे पाणी वाचविणे, त्याचा साठा कसा करावा की ज्यायोगे अडचणींच्या दिवसात ते शिल्लक राहील, याची उत्कृष्ट रचना पुरातन काळात आपल्या पूर्वजांनी केली होती. या विहिरींच्या रूपात आपल्याला ती बघायला मिळते आहे. आपल्या शहरात अनेक वास्तू ऐतिहासिक असून, त्या जपल्या जाऊन जलस्तोत्रांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. ज्यायोगे पर्यटकही येथे भेट देऊ शकतील. चंद्रपूर महानगरपालिका व इको प्रो-संस्थेच्या संयुक्त उपक्रमातून हे अभियान चालविण्यात येत असल्याने आता शहरातील ऐतिहासिक विहिरींचे जलसंवर्धन, जलस्रोत संवर्धन व पुरातन वास्तुंची काळजी घेणे शक्य होणार आहे. याप्रसंगी आयुक्त मोहिते, सहायक आयुक्त विद्या पाटील, इको प्रो-अध्यक्ष बंडू धोत्रे, नितीन रामटेके, विवेक पोतनुरवार, अनिरुद्ध राजुरकर, नितीन रामटेके, पर्यवारण विभाग प्रमुख, ॲडव्हेंचर विंग जयेश बैनलवार, शंकर पॉईंनकर, सौरभ शेटे इको-प्रो सदस्य धर्मेंद्र लुनावत, बिमल शहा, अभय अमृतकर, अमोल उत्तलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, अरुण गोवारडीपे, प्रदत्ता सरोदे उपस्थित होते.