सावरगाव : नागभीड तालुक्यातील सरपंच व उपसरपंचांच्या निवडणुकीत काँग्रेसने चार गावांत बाजी मारली असून, वलनी ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरस्कोल्हे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले.
यासोबतच कन्हाळगाव, चारगाव, नांदेड या गावांतही काँग्रेसने सत्ता काबीज करून आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
तालुक्यातील अतिसंवेदन समजल्या जाणाऱ्या व नऊ सदस्य असलेल्या वलनी ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसप्रणीत सहा व भाजपसमर्पित तीन सदस्य आहेत. या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेसने सत्ता काबीज केली असून, सरपंचपदी अनिल दयानंद बोरकर, तर उपसरपंचपदी प्रकाश चिंधुजी सुरपाम यांची निवड करण्यात आली आहे.
कन्हाळगाव ग्रामपंचायतीवर काँग्रेसने सत्ता काबीज केली असून, सरपंचपदी रमेश घुगुस्कर यांची, तर उपसरपंचपदी प्रकाश सुरपाम यांची निवड करण्यात आली. चारगाव ग्रामपंचायतीवरही काँग्रेसने बाजी मारली असून, सरपंचपदी अनिता अनिल पेंदाम, तर उपसरपंचपदी वर्षा रणधीर राऊत यांची अविरोध निवड झाली तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर धान वाणासाठी प्रसिद्ध पावलेल्या नांदेड या गावातसुद्धा काँग्रेसने ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली असून, सरपंचपदी मुरलीधर गौरकार, तर उपसरपंचपदी जावेद पठाण यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरस्कोल्हे, माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, काँग्रेस तालुका सचिव विनोद बोरकर, सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमराज लांजेवार आदी उपस्थित होते.