महादेव जानकर : पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र दूध उत्पादनात राज्य मागे होते. त्यामुळे आपल्याला अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र ही स्थिती लवकरच पालटणार असून दूध उत्पादनात देशात अग्रेसर होण्याकरिता मंत्री म्हणून काही ठोस पावले उचलण्यात आली आहे. यामाध्यमातून राज्यात दूधाची क्रांती होईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ना. जानकर यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले की, आपल्याला पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविवकास मंत्रिपदाची जबाबदारी येताच शपथ घेतल्यानंतर आवश्यक गोष्टींचा सर्वांगीण अभ्यास करण्याकरिता विशाखापट्टणम, गोवा, ओडिशा, दिल्ली येथे गेलो. आपल्या खात्यांतर्गत जगाची, देशाची तसेच राज्याची स्थिती काय, याचा अभ्यास केला. यात सर्व बाजूंनी राज्य पिछाडीवर असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आले. तेव्हापासून या क्षेत्रात राज्याला अव्वल करण्यासाठीचे ठोस प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील दुधाच्या कंपन्यांना वाव मिळावा, या उद्देशाने अमूलसारख्या कंपनीला राज्यात प्रकल्प तयार करण्यास नकार दिला. आज आरे (भूषण) या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दूध तयार होत आहे. पुढे ही प्रगती आणखी व्यापक होईल. त्यांनी सांगितले की, दुग्धविकासाप्रमाणेच पशुसंवर्धन तसेच मत्स्यविकासाबाबतची स्थिती होती. मत्स्यबीज हे पश्चिम बंगाल तर अंडी आणि कोंबडी तेलंगणासारख्या राज्यातून आयात करावी लागत होती. आता हे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. भविष्यात महाराष्ट्र संपूर्णत: आत्मनिर्भर बनणार आहे. टाटा समूहाच्या माध्यमातून जगातील एकमेव अॅनिमल केअर हॉस्पीटल तयार होणार असून याच्या जागेकरिता तीन दिवसापूर्वीच मंजुरी देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दूध वाढीसाठी ठोस उपाययोजना
By admin | Updated: June 14, 2017 00:25 IST