चंद्रपूर गारठले : पारा ९.२ अंशावर, आणखी थंडी वाढण्याची शक्यताचंद्रपूर : मागील चार दिवसांपासून चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच थंडीची लाट उसळली आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत चंद्रपुरातील तापमानात आणखी घट झाली आहे. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असल्याने याचा दैनंदिन जीवनावरही परिणाम होत आहे. आज शनिवारी चंद्रपूरचा पारा ९.२ अंशापर्यंत पोहचला.चंद्रपूर शहर हॉट शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. येथील उष्णतेमुळे उन्हाळ्यात चंद्रपूरला येण्याचे बाहेर जिल्ह्यातील नागरिक अनेकदा टाळतात. उन्हाची दाहकता सहन करण्याची चंद्रपूरकरांना मात्र सवय झाली आहे. असे असले तरी हिवाळ्याची गुलाबी थंडी चंद्रपूरकरांनाही हवहवीशी वाटतेच. त्यामुळे प्रत्येकजण हिवाळ्याची चातकाप्रमाणे वाट पहात असतो. यावर्षी निसर्ग चंद्रपूरकरांवर कोपल्याचे प्रत्येक ऋतूत दिसून आले. पावसाळ्यात तर वरूणराजाने चंद्रपूरकरांची थट्टाच केली. प्रारंभापासूनच पाऊस हुलकावणी देत राहिला. आॅक्टोबर महिन्यापासून साधारणत: हिवाळा ऋतू सुरू होतो. थंडीचा गारवा आॅक्टोबरपासूनच जाणवायला लागतो. मात्र चंद्रपुरात यंदा नोव्हेंबर महिना लोटला, डिसेंबर महिन्याचा पंधरवाडा लोटला तरी थंडीची चाहुल लागली नाही. एरवी दिवाळीलाच थंडी वाजू लागते. मात्र यावेळी दिवाळी लोटली तरी थंडीचे आगमन झाले नाही. थंडी न पडताच हिवाळाही लोटतो की काय, असे चंद्रपूरकरांना वाटायला लागले. दरम्यान, २० डिसेंबरपासून जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल होऊ लागला. काही दिवस ढगाळ वातावरण दिसून आले. अशातच २४ डिसेंबरला अचानक थंडीचा तडाखा सुरू झाला. या दिवशी अचानक थंडी पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. त्यानंतर २५ डिसेंबरला पारा आणखी कमी झाला. या दिवशी १६.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर पारा चक्क १०.२ अंशावर पोहचला होता.त्यानंतर जानेवारी महिन्याला प्रारंभ होताच आणखी वातावरणात बदल जाणवायला लागला. थंडीची लहर काहिशीे कमी झाली. काही दिवस असेच वातावरण राहिले. त्यानंतर १५ ते १८ जानेवारीदरम्यान अचानक ढगाळ वातावरण दिसून आले. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर तर वाढलाच; सोबत तब्बेतीच्या कुरकुरी सुरू झाल्या. दरम्यान, २० जानेवारीपासून अचानक तापमानात घट झाली. थंडीचा तडाखा जाणवू लागला. काल शुक्रवारी चंद्रपूरचा पारा ११ अंश सेल्सियस नोंदविण्यात आला. आज शनिवारी तर तापमानात आणखी घट झाली असून पारा ९.२ अंशावर पोहचला. (शहर प्रतिनिधी)रात्री वर्दळीचे रस्तेही ओस थंडी वाढल्यामुळे जनजीवनावरही परिणाम झाला आहे. पहाटे फिरायला निघणे वृध्द महिला-पुरुषांनी बंद केले आहे. भल्या सकाळी कुणीही घराबाहेर पडणे पसंत करीत नसल्याचे दिसून येते. एरवी रात्री ११ वाजेपर्यंतही वर्दळ राहत असलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते आता रात्री ९ वाजताच ओस पडू लागले आहे. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्गावरील रात्रीची वर्दळ अचानक कमी झाली आहे. ग्रामीण भागात शेकोट्या पुन्हा पेटल्याग्रामीण भागात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेतला जातो. मागील तीन दिवसांपासून चौकाचौकात, पानटपरीजवळ शेकोट्या पेटू लागल्या आहेत. चंद्रपूरसारख्या हॉट शहरातील नागरिकही थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटविताना दिसून येत आहेत.
जिल्ह्यात थंडीचा तडाखा
By admin | Updated: January 24, 2016 00:50 IST