मूल : येथील केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या डाक विभागाची वेळ सकाळी ८ वाजतापासून असतानादेखील तब्बल एक तास उशिरा कर्मचारी येत असल्याने नागरिकांना तासन् तास वाट पहावी लागते. त्याचबरोबर कर्मचारी ग्राहकांशी सौजन्याने वागत नसल्याने सगळेच त्रस्त झाले आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावे, अशी मागणी जनतेने केली आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मूल शहरात मध्यवर्ती ठिकाणी डाक कार्यालय आहे. याठिकाणी डाक विभागाच्या विविध योजना, सोबतच स्पीड पोस्ट, मनिआर्डर, व्ही.पी., बचत खाते आदी व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक डाक कार्यालयात येतात. सकाळी दररोज ८ वाजता डाक विभागाचे कार्यालय उघडावे, असा नियम असताना मात्र तब्बल एक तास उशिरा कार्यालय उघडले जाते. तोपर्यंत ग्राहक येऊन कार्यालय उघडण्याची वाट बघत असतात. कुणी काही बोलले तर आपण केंद्र शासनाचे कर्मचारी आहोत, असा आव आणूनते बोलतात. कर्मचाऱ्याबरोबरच पोस्ट मास्तर देखील उशिरा येत असल्याने बचत खात्याचे व्यवहार व्हायला बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
डाक विभागातील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईने नागरिक त्रस्त
By admin | Updated: September 18, 2015 01:01 IST