राजुरा : शहरातील मालगुजारी तलाव इकोर्निया वनस्पतीच्या विळख्यात सापडले आहे. सुमारे ६० वर्षांनंतर प्रथमच या तलावांमध्ये वनस्पतीने शिरकाव केल्यामुळे तलावाचे सौंदर्य लोप पावले आहे. शिवाय, मच्छिपालन करणाऱ्या बांधवांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण तलाव इकोर्निया वनस्पतीने वेढल्याने ते निखंदून काढण्यासाठी नगर परिषद व मच्छिंद्र मत्स्यपालन सोसायटीने कंबर कसली आहे.
१९६१ पासून या तलावावर मच्छिंद्र मस्यपालन सहकारी संस्था मासेमारी करीत आहे. सुमारे ३५० भोई समाजातील कुटुंबांचा उदरनिर्वाह या तलावावर आहे. दरवर्षी मत्स्यपालन करण्याकरिता तलावात बीज सोडण्यात येते त्यानंतर पाच ते सहा महिन्याने मासे मोठे होतात. मात्र, तब्बल ६० वर्षांनंतर प्रथमच या तलावात इकोर्निया वनस्पती वाढली. त्यामुळे भोई समाजासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. हे संकट टाळण्यासाठी तलावाची स्वच्छता सुरू करण्यात आली.
नगराध्यक्ष अरुण धोटे, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, स्वच्छता व वैद्यकीय समिती सभापती वज्रमाला बतकमवार, सर्व सभापती, नगरसेवकांच्या सहभागातून तलाव स्वच्छता व सोंदर्यीकरण अभियान सुरू आहे. यासाठी मुख्याधिकरी विजय कुमार सरनाईक मार्गदर्शन करीत आहेत. नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या अभिनव मेकॅनिकल कन्व्हेअर बेल्टच्या साहाय्याने तलावातील वाढलेल्या जलपर्णी जलकुंभी वनस्पती तलावातून बाहेर काढण्यासाठी मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सदस्य श्रमदान करीत आहेत.
माझी वसुंधरा अभियान
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून माझी वसुंधरा राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत पृथ्वी, जल, वायू ,अग्नी , आकाश या पंचतत्वावर पर्यावरण विषयक मानवी स्वभावातील बदलांसाठी शहरात जनजागृती सुरू आहे. शैक्षणिक व सामजिक कार्यक्रमातून महत्त्व पटवून देणे हा अभियानाचा हेतू आहे.
कोट
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणाचे जतन करण्यासाठी नागरिकांनी सहभाग घ्यावा. आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. सर्वांच्या सहभागातून आपले शहर सुंदर होईल.
-अरुण धोटे, नगराध्यक्ष. राजुरा