हरिशचंद्र पाल तळोधी (बां)आजच्या स्थितीत राज्यात पसरलेल्या दुष्काळावर मोठी चर्चा सुरू आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात दुष्काळ नसून पीक परिस्थिती ठीक असल्याचा निर्वाळा प्रशासकीय यंत्रणा जाहीर करून मोकळी झाली. मात्र परिस्थिती काहीशी वेगळीच आहे. कारण शासकीय यंत्रणा फक्त शहरात, मोठ्या गावात, सिमेंट रोड, काँक्रीट रोड असलेल्या गावातच पोहचतच असल्याचा प्रत्यक्ष अनुभव नागभीड तालुक्यातील येनोली (खुर्द) गावात पोहचल्यावरच लक्षात येईल. शेतीचा संपूर्ण हंगाम संपूनही या गावातील ८० टक्के शेतकऱ्यांच्या शेतात धानाची रोवणी झालीच नाही. मात्र त्यांच्या गावापर्यंत प्रशासकीय यंत्रणेचा मागमुसही दिसत नाही. एकंदरीत येनोली (खु.) या गावातील आदिवासी नागरिक दुष्काळाच्या गर्तेत पूर्णत: होरपळून निघाले असून अनेकांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे ‘लोकमत’जवळ बोलून दाखविले.नागभीडपासून अवघ्या २५ किमी अंतरावर असलेले येनोली (खूर्द) गावाची लोकसंख्या जेमतेम २७५ एवढी आहे. या गावात परधान, गोंड, ढिवर या जातीचे ९५ टक्के लोक तर कोहळी समाजाचे फक्त पाच टक्के लोक राहतात. या गावातील जनतेचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरच चालतो. या गावात जायला कच्चा रस्ता असून हिच प्रशासनाची मेहरबानी दिसून येते. गावाच्या चारही बाजूंना घनदाट जंगल आहे. या गावात पटवारी, ग्रामसेवक कृषी सहायक व इतरही अधिकाऱ्यांचे दर्शन होणे दुर्लभच आहे. परंतु, शेती करून प्रसंगी बाहेरगावी मजूरीसाठी जावून कोणतीही कुरकूर न करता मुकाट्याने जीवन जगणे एवढेच येथील लोकांना माहीत आहे. म्हणूनच या गावातील २५० एकर शेतजमीन असलेल्या भागाला पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ६० एकरातील मामा तलाव तसेच २५ एकराचे क्षेत्र असलेल्या झाडाची बोडी या दोन्ही तलावाकडे प्रशासनाने लक्ष न पुरविल्याने या आदिवासी, दुर्गम गावातील शेतकऱ्यांच्या ९० टक्के शेतकऱ्यांच्या शेतजमीनीत भाताची रोवणी झालीच नाही. टाकलेले पऱ्हे पूर्णत: वाळून गेले. ६० एकरातील तलावाचे पाच वर्षापूर्वी रोहयोमधून थातूर-मातूर केलेल्या कामामुळे तलावात पाणीच नाही. याबाबत गावकऱ्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, कृषी विभागाकडे तक्रार केली. जि.प. सदस्या लीना पेंदाम व भाजपा तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम समवेत कृषी अधिकारी पठाण यांनी भागाला भेट दिली. परंत, इतर अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.
दुष्काळाच्या वणव्यात होरपळताहेत येनोली (खुर्द) गावचे नागरिक
By admin | Updated: November 3, 2015 00:25 IST