प्रस्ताव मागितले : नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा चिमूर : चिमूर नगरपरिषदेच्या निर्मितीला एक वर्षाचा कालावधी झाला असून शहराच्या विकासासाठी अनेक विभागातून निधी देण्यात येत आहे. तर या शहराच्या २० वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांकडून प्रस्ताव मागितले आहेत. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाल्याने नगर विकास विभागाच्या मार्फत शहराचा विकास करण्याकरिता मागील एक वर्षापासून अनेक फंडातून निधी आणण्याचा प्रयत्न आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्याकडून सुरू आहे. त्यामध्ये सिमेंट रस्ते, नाल्या, विद्युत व्यवस्था यासह अनेक प्रकारची कामे करण्याकरिता निविदाही काढण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त क्रांतीनगरीच्या विकासासाठी आगामी काळात विकास आराखडा तयार करण्याकरिता नगर परिषदेकडून गुरूवारी ११ वाजता शेतकरी भवन येथे शहरातील नागरिकांची जनसुनावणी करण्यात आली. त्या जनसुनावणीला नगराध्यक्षा शिल्पा राचलवार, उपाध्यक्ष विकास शिंदे, मुख्याधिकारी मनोजकुमार शहा तर सर्व सभापती, नगरपरिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. विकास आराखड्यासाठी आयोजित सभेमध्ये शेकडो नागरिक हजर झाले. नागरिकांनी प्रभागानुसार आपल्या-आपल्या वॉर्डातील समस्यांचा पाढा वाचला. अनेकांनी शहराच्या विकासासाठी आपापली मते नोंदविली. काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, सपा, रिपाइं तथा सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपले लेखी प्रस्ताव सादर केले. या अभिप्रायातून चिमूर शहराचा २० वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
चिमूरच्या विकासावर उमटणार नागरिकांची मोहर
By admin | Updated: August 12, 2016 01:04 IST