घुग्घुस : येथील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या गैरहजरीमुळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी त्रस्त झाले आहेत. त्याच बरोबर जन्म , मृत्यु , गाव नमुना, शालेय विद्यार्थी व नागरिकांना अन्य दाखले वेळेवर मिळत नसल्याने संताप पसरला आहे. मागील १० महिन्यांपासून घुग्घुस ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्यात दुफळी निर्माण झाली आहे. ग्रामविकास अधिकारी मासिक सभा, ग्रामसभेत गैरहजर राहत असल्याने सरपंचाची कुचंबणा होत आहे. घुग्घुस ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. मात्र ग्रामविकास अधिकारी वारंवार कार्यालयात गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी सरपंचाक व सदस्यांकडून होत आहेत. नवीन ग्रामविकास अधिकाऱ्यांची मागणी केली जात आहे. मात्र बीडीओ, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून दखल का घेतली जात नाही, हा नागरिकांत चर्चेचा विषय ठरला आहे. गुरूवारी पुन्हा सरपंचानी ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर मागील पत्राचा उल्लेख करून नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. याची दखल घेण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या गैरहजरीने नागरिकांची पायपीट
By admin | Updated: August 5, 2016 01:00 IST