आंबोली जि.प शाळा : पदवीधर शिक्षक नाहीआंबोली : येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या दीड वर्षांपासून पदविधर शिक्षक नाही. गणित आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यावर बंदी घातली असून २२ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांनी शाळेत येणेच बंद केले आहे. जिल्हा परिषद आंबोली शाळा येथे १ ते ७ पर्यंत वर्ग आहेत. येथे १५७ विद्यार्थी असून पाच शिक्षक आहेत. शाळेत इंग्रजी व गणित विषयाचा पदविधर शिक्षक नसल्यामुळे दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांना गैरसोय सहन करावी लागत आहे. पदविधर शिक्षक मिळावा म्हणून संवर्ग विकास अधिकारी तसेच गट शिक्षण अधिकारी चिमूर व मुख्याध्यापक यांना गावकऱ्यांनी विनंती अर्ज केले. मात्र, एक वर्ष लोटूनही पदविधर शिक्षक मिळाला नाही. शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालक वर्गाने विद्यार्थ्यांची शिक्षणात गैरसोय होत असल्यामुळे मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांविना शाळा ओसाड पडली आहे. शिक्षक मात्र शिक्षण विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे व पालकांच्या निर्णयामुळे चिंतेत पडले आहेत. गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चिमूर यांना शाळा व्यवस्थापन समितीने पदविधर शिक्षक मिळावा म्हणून अनेक वेळा विनंती केली. मात्र दुर्लक्ष केले. आंबोली येथील शाळेचा विषय गंभीर झाला असून पदविधर शिक्षक मिळेपर्यंत विद्यार्थी शाळेत जाणार नाहीत, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. पूर्वीचे पदविधर शिक्षक लांडे यांची बदली झाली. त्यांच्या जागी अजूनही पदविधर शिक्षक शाळेला मिळाला नाही. शिक्षकाची लवकर नियुक्ती करण्याची मागणी व्यवस्थापन समितीचे काशीराम चवरे, शशीकला यशवंत टापरे, मधूकर नागपुरे, हरिचंद्र वांढरे, दामोधर बारेकर, महेंद्र नगराळे, पुष्पा जांभुळे, वंदना बारेकर, नलिनी वाकडे, सलीम शेख यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंद केल्याने शिक्षण विभाग दखल घेते काय, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास गावकऱ्यांची बंदी
By admin | Updated: September 24, 2014 23:27 IST