लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील मार्च महिन्यापासून सुरू झालेले कोरोनाचे संकट अद्यापही घोघांवत आहे. डिसेंबर महिन्यापासून काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. हीच संधी साधत नागरिकांची बेफिकिरी वाढली असून, बाजार तसेच इतर ठिकाणीही सोशल डिस्टन्स तसेच मास्क न लावताच वावरताना दिसत आहेत. आता प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजचेे आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये अमरावती, यवतमाळ, वाशिम, भंडारा, वर्धा आदी जिल्हात मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे यातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवार, रविवारी लाॅकडाऊन केले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे लाॅकडाऊनची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्कचा वापर करणे अत्यावश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश नागरिक याबाबत गंभीर नसून सार्वजनिक ठिकाणांसह खासगी प्रतिष्ठान तसेच बाजारामध्येही मास्क न लावता फिरत आहेत.यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच अधिकाऱ्यांना कठोर होण्याचेे निर्देश दिले आहेत.हाॅटेल, चहाटपरी, पानटपरी, चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहे.
कारवाईची मोहीम पु्न्हा सुरुजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगरपरिषद, नगरपंचायत, महापालिका प्रकाशन सर्तक झाले असून त्यांनी बाजारपेठांमध्ये मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करणे सुरु केले आहे. एवढेच नाही तर वाहतूक पोलिसांनीही आता नागरिकांवर कारवाई करणे सुरु केले आहे.
मास्क न लावताच दुकानात प्रवेशप्रत्येकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.आम्हाला काहीच होत नाही, अशाच अविर्भावात ते आहेत. दुकानात जातानाही मास्क, सॅनिटायझर न लावताच ते वावरत आहेत.
२३ कोरोना बाधितांची भर, एकाचा मृत्यूजिल्ह्यात मागील २४ तासात कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर २३ बाधितांची नव्याने भर पडली. शुक्रवारी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ३१७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोराेनातून बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८०३ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.