चिमूर : चिमूर नगर परिषद ३० मे २०१५ ला अस्तित्वात आली असून नगर परिषद अंतर्गत नागरी वस्ती विखुरलेली आहे. गोरगरीब नागरिकांना आर्थिक परिस्थितीमुळे घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य नव्हते. म्हणून शासनाने शहरी भागासाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुरू केली. मात्र नगर परिषदच्या निर्मितीच्या पाच वर्षे लोटूनही नागरिकांचे घराचे स्वप्न अधुरे होते. दरम्यान, आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नाने ६९३ नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.
आ. भांगडिया यांनी भारत सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना योजना मिळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निवेदन देऊन मागणी केली होती. याची दखल घेत अखेर चिमूर नगर परिषद अंतर्गत घरकुलच्या पहिल्या यादीत ६९३ घरकुल डीपीआर मंजूर झालेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन २०२२ पर्यत सर्वांसाठी घरे या कार्यक्रम अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेमधून चिमूर नगर परिषदच्या घरकुल लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. भारत सरकारच्या पंतप्रधान आवास योजना शहरी योजनामध्ये चिमूर नगर परिषदचा एमआयएस यादीत समावेश करण्यात आला आहे.
हा समावेश केल्याने घरकुलचा प्रश्न सुटला असून पहिल्या यादीतील ६९३ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे.
चिमूर नगर परिषद क्षेत्रात चिमूरसह बामणी, सोनेगाव सिरास, काग, शेंडेगाव, सोनेगाव बेगडे पिंपळनेरी, वडाळा, खरकडा या ग्रामीण गावांचा समावेश असल्याने या गावातील घरकुल लाभार्थ्यांना आता घरकुल मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे घरकुल लाभार्थ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.