४३ ग्रामपंचायतींच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत सात सदस्यीय चेकबेरडी ग्रामपंचायत अविरोध झाल्यामुळे ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार असून गोंडपिपरी तालुक्यात ३३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ८४९ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यापैकी ५९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. चेकबेरडीतील सात उमेदवारांसह तालुक्यातील एकंदरीत ३९ उमेदवार अविरोध निवडून आले. २९८ जागांसाठी मतदान होणार असून याकरिता ७५१ उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहेत.
दरम्यान, तालुक्यातील निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन तहसीलदार के. डी. मेश्राम, ठाणेदार संदीप धोबे यांनी केले आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांचे डेमो ११ जानेवारीला तालुका क्रीडा संकुल येथे सकाळी ८ वाजता दाखविले जाणार आहे. याकरिता निवडणूक प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.