चौपदरीकरणामुळे नागरिकांना दिलासा
चंद्रपूर : शहरातील पाणी टाकी, इंदिरा गांधी पुतळा ते वरोरा नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या या रस्त्यावरून वाहनधारक सुसाट आपले वाहने पळवित आहेत. दरम्यान, रस्त्याच्या मधात असलेल्या मोठ्या वृक्षांमुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे येथील वृक्ष हटवावे, अशी मागणी केली जात आहे.
वीज खांबांची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरातील जुन्या वस्त्यांमधील काही भागातील वीज खांब वाकले आहेत. त्यामुळे या खांबांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. अनेक दिवसांपासून खांब वाकलेल्या अवस्थेत उभे आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे
चंद्रपूर : शहरातील दुर्गापूर रस्त्यावरील पोलीस सभागृह परिसरात काही फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असून, व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.
अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील काही भागांमध्ये अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील गांधी चौक, तुकूम, जटपुरागेटपर्यंत रस्ता रुंदीकरण केले जात आहे; मात्र अनेकांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रथम अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.
बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही
चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. असे असले तरी नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. बाजारामध्ये मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे अधिकाधिक दंड आकारून त्यांना शिस्त लावावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.
प्रदूषित वाहनांवर बंदी घाला
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. वाहनांद्वार प्रदूषणात वाढ होत आहे.
‘एटीएम’ची सुरक्षा रामभरोसे
चंद्रपूर : शहरातील काही ‘एटीएम’ केंद्रामध्ये सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळामध्ये एटीएम केंद्रामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे; मात्र शहरातील बहुतांश ‘एटीएम’मध्ये ही सुविधाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
बंगाली कॅम्प भाजीबाजारात कचरा
चंद्रपूर: येथील बंगाली कॅम्प बाजारात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाजारात खरेदी करण्यासाठी अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात.