घुग्घुस : वेकोलि वणी व वणी नाॅर्थमध्ये ओबी व कोळसा वाहतूक करणाऱ्या परप्रांतीय पासिंगच्या वाहनांची प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर व यवतमाळ कार्यालयाकडून तपासणी केल्यास कर चुकवून या क्षेत्रात कार्यरत असलेली विविध जडवाहने आढळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करावीच, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
चार दिवसापूर्वी वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूरच्या पोलीस निरीक्षकांनी राजस्थान पासिंगचे दोन हायवा ट्रक क्षमतेपेक्षा अधिक कोळसा वाहतूक करीत असताना ताब्यात घेऊन कागदपत्रे तपासली असता, राज्याचा कर चुकवून या कोळसा क्षेत्रात वाहने काम करीत असल्याचे समोर आले. या क्षेत्रातील ओबी हटविण्यासाठी विविध कोळसा खाणीत बाहेरील मोठमोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. परप्रांतीय ट्रान्स्पोर्टर कंपन्यात त्या त्या राज्यातील शेकडो वाहन चालकापासून तर अन्य काम करणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे. भाषा समजणे अवघड असते. त्यामुळे कंपनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यास टाळाटाळ करीत असते. वणी क्षेत्रातील नायगाव, मुंगोली, निलजई, उकणी, कोलगाव, पैनगंगा कोळसा खाणीत ओबी (कोळसाच्या थरावरील माती) उचलण्याचे मोठे काॅंन्ट्रॅक्ट कंपन्यांना देण्यात आले. त्यातील बहुतांश ट्रान्सपोर्ट कंपन्या राज्याबाहेरील आहेत. त्यांच्याकडे त्या त्या राज्याचे पासिंग असते. मात्र त्याचे पासिंग कायदेशीर आहे किंवा नाही, यासंदर्भात चंद्रपूर-यवतमाळ प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व घुग्घुस शिरपूर वणी पोलीस विभागाकडून तपासले जात नाही. राज्याचा कर चुकवून वाहने चालविली जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील विविध कोळसा खाणीतील कार्यरत परप्रांतीय पासिंग असलेल्या वाहनांची कागदपत्रे तपासून पाहावीत, अशी मागणी कामगार वर्गाकडून होत आहे.