चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात हळूहळू कोरोना पुन्हा पाय पसरू लागला आहे. यातच चंद्रपूर महानगरासह चंद्रपूर तालुक्याला केव्हाही विळख्यात घेऊ शकते. ही बाब गेल्या आठ दिवसांतील आकडेवारीतून लक्षात येणारी आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन चंद्रपूरकरांना आताच कोरोनाच्या संसर्गापासून सावध राहण्याची गरज यावरून दिसून येते.
चंद्रपूर महानगरात गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल २६३ कोरोना रुग्णांची भर पडली. याची सरासरी काढल्यास दिवसाला ३७ रुग्णांची एकट्या चंद्रपूर शहरात भर पडत आहे. यासोबतच चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागातही १५ दिवसांत ८८ रुग्ण वाढले होते. यात ७३ रुग्ण गेल्या आठ दिवसातील आहेत. यावरून चंद्रपूर महनगरासह तालुक्यात कोरोनाने पाय पसरणे सुरू केले आहे. चंद्रपूर महानगरात १० मार्चला २५, ११ मार्च २९, १२ मार्च २७, १३ मार्च ६०, १४ मार्च ४१, १५ मार्च २१, १६ मार्च ६० असा रुग्णवाढीचा क्रम राहिला आहे. मार्च महिन्यातील रुग्णवाढीचा आढावा घेतल्यास तब्बल ४२९ रुग्णांची भर चंद्रपूर महानगरात पडली आहे. या महिन्यात चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागात ८८ रुग्णांची भर पडली आहे. गेल्या आठ दिवसात ही संख्या चांगलीच वाढली आहे.