वरोरा : विना परवानगीने अवैधरित्या गौण खनीज उत्खनन करून विल्हेवाट लावल्याने शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी वरोरा पोलिसात चंद्रकांत वासाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी गुरूवारी वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.वरोरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नंदोरी गावालगतच्या चोपन रिठ येथील सर्व्हे क्रमांक १९ व १७ मध्ये शासनाची परवानगी न घेता अवैधरित्या उत्खनन केले. या प्रकरणी खनिकर्म निरीक्षक दिगराज पेंठारकर यांनी वरोरा पोलिसांत चंद्रकांत वासाडे यांच्या विरुद्ध ३० मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन वरोरा पोलिसांनी चंद्रकांत वासाडे यांच्या विरुद्ध कलम ४२०, ४२७, भादंवि व ४८ (७) (क) नुसार गुन्हा दाखल केला होता. काही दिवसापूर्वी चंद्रकांत वासाडे यांना तात्पुरता जामीन न्यायालयाने दिला होता. २१ एप्रिल रोजी सदर प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता वासाडे यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के.एन. गौतम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून चंद्रकांत वासाडे यांचा जामीन अर्ज फेटाळला. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. मिलिंद देशपांडे यांनी बाजू मांडली. (तालुका प्रतिनिधी)
चंद्रकांत वासाडे यांना अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Updated: April 22, 2016 02:56 IST