कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या दहा हजार लोकवस्तीच्या गावात वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र असूनही विजेचा सतत लपंडाव सुरू होता. वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कार्यप्रणालीने गावकरी त्रस्त झाले होते. याबाबत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार केली. त्यांनी गावात सतत चार बैठका वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व नागरिकांसह घेतल्या. सध्या गावातील वीज पुरवठा पुर्ववत सुरू झाला आहे. कोठारीतील वीज समस्या निकाली काढण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेवून चंदनसिंग चंदेल, हरिश शर्मा, देवराव भोंगळे यांना वीज वितरण अधिकाऱ्यासोबत बैठका घेवून समस्यांचा निपटारा करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने चार बैठकीत वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता यांना कोठारीत बोलावून वीज खंडीत असण्याचा जाब विचारण्यात आला. सतत चार बैठकानंतर कोठारीतील वीज सुरळीत करण्यात आली. चंदनसिंग चंदेल यांच्या प्रयत्नाने वीज पुरवठा सुरळीत असून गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे. गावात अखंडीत वीज पुरवठ्यासाठी वीज अभियंत्यानी ट्री कटींगसह उपकेंद्रातील त्रुट्या पूर्ण करून सर्व कर्मचाऱ्यांना ताकीद दिली व वीज खंडीत होणार नाही, यावर कटाक्षाने कर्मचाऱ्यांना कार्यान्वित केले. (वार्ताहर)
चंदनसिंग चंदेल यांच्या मध्यस्थीने कोठारीतील वीज पुरवठा सुरळीत
By admin | Updated: August 5, 2016 01:01 IST