घनश्याम नवघडे ल्ल नागभीड हातात झाडू घेऊन फोटो काढणे आणि प्रसिद्धी मिळविणे ही आता फॅशन झाली आहे. मात्र कोटगावातील ग्रामस्थ नित्यनेमाने मागील काही महिन्यांपासून पहाटे उठून गाव स्वच्छ करीत आहेत. एवढेच नाही तर आजपर्यंत ३ लाख ५० हजार रुपयांचे नागरिकांनी श्रमदान केले आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून कोटगावची ओळख आहे. मात्र स्वच्छता अभियान आणि गावाच्या विकासासाठी जातपात आणि राजकारण विसरून नागरिक एकत्र आले आहे. यातून गावाचा चेहरा बदलत आहे. नित्यनेमाने दररोज पहाटे ४ वाजता गावकरी एकत्र येतात आणि पहाटेच्या काळोखात गाव झाडून स्वच्छ करतात. त्यानंतर श्रमदानही केले जाते. आजपर्यंत गावकऱ्यांनी तीन लाख ५० हजार रुपयाचे श्रमदान केले आहे. या श्रमदानात गावातील नाल्या-गटारे साफ केले. गावातील मोकळी जागा स्वच्छ करून ती सार्वजनिक कामासाठी तयार केली. काही रस्त्यांची दुरुस्ती केली, श्रमदानातून शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी आदी कामांचा यात समावेश आहे. या अभियानात सातत्य रहावे यासाठी दर चार-पाच दिवसात पुढे काय करायचे, यावर विचारविमर्श करण्यासाठी सभा घेतली जाते. सभेमध्ये गावाच्या मध्यभागी बाग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावात प्रवेशद्वार आणि ७४०० चौरस फूट जागेला श्रमदानातून संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला. येत्या काही दिवसात संपूर्ण गावातील घरांना तसेच शासकीय इमारतींना एकाच रंगाने रंगरंगोटी करण्याचाही ग्रामस्थांचा मानस आहे.
पहाटेच्या संधीप्रकाशातच लख्ख उजळून निघते गाव
By admin | Updated: March 13, 2015 01:10 IST