गोंडपिंपरी : औद्योगिक जिल्हा म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात व्यसनाधिनतेचे प्रमाण व त्यातून बळी ठरलेल्या तसेच उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाना न्याय देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात दारुबंदी करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली. एप्रिल महिन्यापासून दारुबंदी होणार असे संकेतही मिळाले आहेत. या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत झाले असले तरी हा व्यवसाय बंद पडण्याच्या भीतीने ‘लिकर लॉबी’ चांगलीच हादरली आहे. आता दारुबंदीच्या निर्णयावर स्थगिती आणण्यासाठी माहिती अधिकारान्वये दारुबंदीचा ठराव पारित करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ठरावाची मूळप्रत मिळविण्यासाठी या लॉबीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात वाढती व्यसनाधिनता व त्याचे दुष्पपरिणाम लक्षात घेऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा दारुबंदीचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करून घेतला. यामुळे कोट्यवधीची उलाढाल करणाऱ्या मद्यसम्राटांच्या पायाखालची जमिन सरकली. अशातच मद्यसम्राटांनी कामगारांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुढे रेटला. मात्र शासनाने मद्यविक्री दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पुनर्वसनासंदर्भातही विचार केला जाईल, असे शासनस्तरावर स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मद्यसंम्राटांचा तोही मुद्दा गौण ठरविल्या गेला. अशातच जिल्ह्यातील मद्य व्यवसायिकांनी आता वेगळीच शक्कल लढवून जिल्हाभरातून दारुबंदीची मागणी करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ठरावाची माहिती अधिकारान्वये मूळप्रत घेण्याची मोहिम हाती घेतली आहे.
ग्रामपंचायतीचे ठराव जमा करण्याची धडपड
By admin | Updated: March 1, 2015 00:48 IST