चंद्रपूर : विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव-देवाडा बूज-नांदगाव-थेरगाव-देवाडा खुर्द-पोंभुर्णा-घनोटी-उमरी -कवडजई फाटा ते किन्ही-येनबोडी रस्त्यावर २४ कोटी ७६ लाख रुपये किमतीच्या मोठ्या पुलाच्या बांधकामाला केंद्रीय मार्ग निधीतून मंजुरी दिली आहे.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन तथा राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार मुनगंटीवार यांना पत्र पाठवून सदर पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिल्याबाबत कळविले आहे. या रस्त्याचे बांधकाम सन २०२०-२१ या वर्षाच्या केंद्रीय मार्ग निधीच्या नियोजनात समाविष्ट करण्यात आले असून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव, देवाडा बुज, नांदगाव, थेरगाव, देवाडा खुर्द, पोंभुर्णा, घनोटी, उमरी, कवडजई फाटा ते किन्ही, येनबोडी रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी आमदार मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार करून ही मागणी रेटली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सदर पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.