पत्रकार परिषदेत उत्सव समितीने दिली माहिती : सलग चार दिवस कार्यक्रमांची रेलचेलब्रह्मपुरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव १४ एप्रिल ते १७ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाने साजरे होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने पंचशील वसतिगृहाच्या पटांगणावर झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक अशोक रामटेके यांनी दिली. चार दिवसीय जयंती कार्यक्रमाच्या निमित्याने १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून बाबासाहेबांच्या जीवनावर चार महत्त्वपूर्ण झाँकींचा समावेश राहणार आहे. ही झाँकी दुचाकी, चारचाकी वाहनावर शहराच्या प्रमुख मार्गाने फिरविण्यात येऊन बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे चौकात समारोप करण्यात येईल. १५ एप्रिलला डॉ. विनायक तुमराम यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्ष म्हणून दैनिक महानायक मुंबईचे संपादक सुनिल खोब्रागडे राहणार आहेत. अभिनया कांबळे (सोमय्या कॉलेज मुंबई), विरा साथीदार (अभिनेते नागपूर) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. १६ एप्रिलला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र उभारणीतील योगदान’ या विषयावर प्रा. डॉ. प्रसादास भडके यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. याच दिवशी कविवर्य लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली महाकवि संमेलन आयोजित केला असून शंभर कविंचा सहभाग राहणार आहे. १७ एप्रिलला महिला-युवक रोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित होणार असून या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून एस.एस. बागडे, अध्यक्ष म्हणून संघमित्रा ढोके तर विशेष अतिथी म्हणून पी.जी. कुलकर्णी, फादर जेकब, रूपेश रामटेके, एस.जे. खोब्रागडे, नरेश उगेमुगे राहणार आहेत. सुप्रसिद्ध गायक विरेंद्र बोरडे यांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम होणार आहे. समितीचे २०५ सदस्य या आयोजनासाठी परिश्रम घेत असल्याची माहिती अध्यक्ष अशोक रामटेके यांनी दिली. यावेळी दादाजी शेंडे, डॉ. युवराज मेश्राम, आसाराम बोदेले, शंकरराव मेश्राम, विजय रामटेके, सरिता खोब्रागडे, सुधीर अलोणे, जगदिश मेश्राम, पी.बी. रामटेके, बौद्धरक्षक जांभूळकर, डॉ. मिलींद रंगारी व समितीचे बहुतांश सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवनिमित्य ब्रह्मपुरीत विविध कार्यक्रम
By admin | Updated: April 8, 2016 01:00 IST