चंद्रपूर : नामांकन भरण्यासाठी अवघा एक दिवस उरला असतानाही जिल्ह्यात जवळपास सर्वच प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीबद्दल अनिश्चितता कायम होती. यामुळे उमेदवार कोण होणार हाच प्रश्न शुक्रवारी दिवसभर आणि सायंकाळनंतरही विचारला जात होता.आघाडी आणि युती तुटल्याने जिल्ह्यातील राजकारणात जबरदस्त ताण आला आहे. आजवर एवढी नाजूक स्थिती राजकारणात पाहिली नव्हती, असे जुने जाणते राजकीय नेतेमंडळी सांगत आहेत. यावरून राजकारणातील तणावाची कल्पना स्पष्ट होत आहे.चार प्रमुख पक्षांपैकी कुण्याही पक्षाने शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत उमेदवार जाहीर केलेले नव्हते. यामुळे दिवसभर उमेदवार अमुक होणार, तमुक होणार अशाच चर्चा जिल्ह्याभर रंगत होत्या. काँग्रेसने राजुरा, ब्रह्मपुरी आणि चिमूर या तीन ठिकाणी अनुक्रमे सुभाष धोटे, विजय वडेट्टीवार आणि अविनाश वारजुकर यांची नावे दोन दिवसांपूर्वी जाहीर केली आहेत. बल्लारपूर, वरोरा आणि चिमुरातील नावे रात्रीपर्यंत गुलदस्त्यात होती. वरोरासाठी विद्यमान आमदार संजय देवतळे आणि त्यांचे बंधु डॉ. विजय देवतळे या दोघांचीच नावे दिवसभर सुरु होती. सायंकाळनंतर संजय देवतळे यांचे नाव आघाडीवर होते. चंद्रपूरसाठी महेश मेंढे यांचे नाव दुपारपर्यंत आघाडीवर होते. मात्र सायंकाळनंतर राजेश कांबळे यांचेही नाव चर्चेत आल्याने अनेकांनी मुंबईचा कानोसा घेतला. मात्र अधिकृत नाव पुढे आलेलेच नव्हते. बल्लारपुरातून विजया बांगडे यांचे नाव सायंकाळनंतर चर्चेत आले. भाजपात वरोरा वगळता पाचही ठिकाणी उमेदवार जवळपास ठरले आहेत. दुपारी ओम मांडवकर यांना मुंबईहून फोन आले होते. तयारी करण्याचे सांगितलेही होते. मात्र सायंकाळनंतर मनसेतील एक नाव चर्चेत आल्याने वरोरावासीयांची उत्सुकता ताणली होती. चंद्रपुरातून नाना श्यामकुळे यांनाच तिकीट मिळणार असल्याने किशोर जोरगेवार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चंद्रपुरात जोरदार चर्चा होती. मात्र शिवसेनेने गोपनीयता पाळली आहे. शिवसेनेच्या गोटातून केवळ वरोरासाठी बाळू धानोरकर यांचे नाव सांगण्यापलिकडे कोणतीही माहिती दिली जात नव्हती. यामुळे शिवसैनिकही दिवसभर अस्वस्थ दिसत होते. राष्ट्रवादीच्या गोटातही आज दिवसभर अशीच गोपनियता दिसली. मात्र सायंकाळनंतर बल्लारपूरसाठी घनश्याम मुलचंदानी आणि चंद्रपूरसाठी अशोक नागापुरे यांची नावे अचानकपणे चर्चेत आल्याने खळबळ उडाली होती. मात्र या नावांची अधिकृतपणे पुष्टी केली जात नव्हती. यामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात दिसत होते. (जिल्हा प्रतिनिधी)
उमेदवारीचे कोडे उशिरापर्यंत कायम : राष्ट्रवादी, शिवसेनेत तिकिटांची गोपनीयता
By admin | Updated: September 27, 2014 01:22 IST