लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान त्वरित द्या
पोंभुर्णा : नगर पंचायतमध्ये मागील तीन वर्षापूर्वी पंतप्रधान आवास योजनांतर्गत शेकडो लाभार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी काही लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी घेऊन आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना शासनाकडून अनुदान मिळेलच, या आशेने आपले राहते घर खोलून बांधकाम सुरू केले. मात्र, वर्षभरापासून अनुदान न मिळाल्याने लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
उद्योगाविना बेरोजगारांमध्ये नैराश्य
भिसी : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भिसीमध्ये उद्योगधंदे नसल्यामुळे येथे बेरोजगारांची फौज वाढली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन येथे धानावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारून रोजगार द्यावा, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.
तंटामुक्त समित्यांना सक्रिय करण्याची मागणी
राजोली : तत्कालीन गृहमंत्री आबा पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावात तंटामुक्त समितीची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र सद्यस्थितीत या समित्या थंडबस्त्यात आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर या समित्या सक्रिय कराव्यात, अशी मागणी सूज्ञ लोकांकडून होत आहे.
सिग्नल सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील काही चौकातील सिग्नल सुरू नसल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका तसेच वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन शहरतील सिग्नल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील ट्रायस्टार हॉटेलजवळ तसेच मिलन चौकामध्ये सिग्नल आहे. मात्र ते बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या चौकामध्ये अपघाताची शक्यता आहे. अपघात टाळण्यासाठी सिग्नल सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
झुडपामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात
पळसगाव : शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने गावागावात तलाव, बोडी तयार केल्या. मात्र यातील बहुतांश गावातील तलावात व बोड्यांमध्ये झुडपे वाढल्याने पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात खरीप तसेच रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे. संबंधित विभाागाने याकडे लक्ष देऊन झुडपे तोडावीत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या
सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
जिवती परिसरातील मोबाईलधारक त्रस्त
जिवती : तालुक्यातील बहुतांश गावात मोबाईल टॉवर नसल्याने तसेच असलेल्या गावात टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील अनेक ग्राहक उंच जागेचा आधार घेऊन इतरांशी संपर्क साधतात. त्यामुळे येथील टॉवरची कव्हरेज क्षमता वाढविण्याची मागणी आहे.
कृषिपंपांची वीज जोडणी करण्याची मागणी
राजुरा : तालुक्यातील कृषिपंप वीज जोडणीची कामे मागील अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करून व डिमांड भरूनही अनेकांना जोडणी करून मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज जोडणी करून देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लालपरीच्या प्रवासीसंख्येत होतेय वाढ
चंद्रपूर : सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या ‘लालपरी’ची थांबलेली चाके आता धावू लागली आहे. आतापर्यंत ५० टक्के क्षमतेने धावणाऱ्या बसमधून आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने याबाबतचे आदेश काढले असून, जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
वरोरा नाका परिसरात सिग्नल सुरू करा
चंद्रपूर : येथील वरोरा नाका परिसरात अपघातावर आळा घालण्यासाठी येथे उड्डाणपूल बांधकाम आले आहे. या पुलाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. मात्र येथे भरधाव वेगाने वाहन जात असल्यामुळे सिग्नल लावण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, जुन्या उड्डाणपुलामुळे येथे अनेक अपघात झाले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा
चंद्रपूर : कोरोना संचारबंदीच्या कालावधीत चंद्रपूर शहरासह जिल्ह्याच्या शहरी भागात भाड्याने राहणारे ग्रामीण भागातील अनेक कुटुंब व विद्यार्थी स्वगावी परतले. तेव्हापासून बऱ्याच घरमालकांच्या खोल्या रिकाम्या आहेत. या घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा आहे. शहरातील सिस्टर कॉलनी, तुकूम, हरिओमनगर, जटपुरा गेट परिसरात अशा अनेक ठिकाणी भाड्याने रूम देणे आहे, अशा पाट्या अनेक ठिकाणी झळकत असल्याचे दिसून येत आहे.
मैदानी खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर
बोथली : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. मोबाईल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाईलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खासगी बस चालकांना कर्ज भरण्याची चिंता
चंद्रपूर: कोरोनामुळे यावर्षी सर्वांवरच परिणाम झाला आहे. दरम्यान, काहींनी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बस खरेदी करून नवा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र आता प्रवासीच नसल्यामुळे या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच कर्ज घेऊन घेतलेल्या या बसचे कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता त्यांना सतावत आहे.
मामा तलावाच्या सर्वेक्षणाची मागणी
ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावाचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गाव विकासासाठी योगदान द्यावे
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. लॉकडाऊनमुळे अनिष्ट परिणाम झाला. मात्र उद्योग परिसरातील गावांचा अद्याप विकास झाला नाही. करवसुली न झाल्याने ग्रामपंचायतींना विकास कामे करताना यंदा अडचणी येणार असून, नवीन योजनाही बंद आहेत. त्यामुळे उद्योगांनी गावांना दत्तक घेऊन गावाच्या विकासासाठी योगदान देण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
सावली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
सावली : तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु, अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. रात्री अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सौरदिवे दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
शहरातील नळ जोडणीची तपासणी करा
चंद्रपूर : शहरातील अनेक वाॅर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. शहरातील काही वाॅर्डात एक दिवसाआड पाणीपुरवठा होता. त्यातही टिल्लूपंपाचा वापर करण्यात येत असल्याने पाणी मिळणे कठीण जात आहे. परिणामी, पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.
रिक्त पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. रबी हंगामाचे दिवस सुरू आहेत. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत आहेत. परंतु, महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे. यातील काही रिक्त पदे अनुकंपा तत्त्वातील आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील रस्त्यावर बांधकाम साहित्य
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहे. त्यामुळे दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. मनपाने सर्व वॉर्डांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
गंजवाॅर्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी
चंद्रपूर : येथील गंजवाॅर्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. नुकतीच महाविद्यालये सुरू झाली असून या रस्त्यावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. मात्र दुर्गंधीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी होत आहे.
वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकांचे अतिक्रमण
कोरपना : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये परिसरात वाहनांची संख्या वाढली. या परिसरातील रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
नाली उपसण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गोंडपिपरी : शहरातील अनेक प्रभागात घाणीचे साम्राज्य आहे. या घाणीमुळे शहराला जणू अस्वच्छतेचा विळखा पडल्याचे दिसून येते. सध्या शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. तर दुसरीकडे अनेक प्रभागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनामुळे नागरिक त्रस्त असताना अस्वच्छतेमुळे पुन्हा आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक ठिकाणी व्यायामशाळा उपलब्ध नाही. तसेच ओपन जीममधील साहित्याची मोडतोड झाली आहे. त्यामुळे व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी युवकांकडून होत आहे.
कलाकारांना मदत देण्याची मागणी
सिंदेवाही : पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीला दीडशे वर्षांची परंपरा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कलाकार आहेत. मात्र लॉकडाऊन व त्यानंतरच्या काळात कार्यक्रमच होत नसल्याने या कलाकारांवर मोठा आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून कलाकारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.